Election Results : पुण्यासाठी जास्त निधी आणू (व्हिडिओ)

Girish-Bapat
Girish-Bapat

पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे.

पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत बापट यांची विजयी घोडदौड सुरू असताना त्यांच्या निवसस्थानाबाहेर जल्लोष सुरू होता. अभिनंदनाचा वर्षाव होत असताना त्यांनी सर्वांत आधी ‘सकाळ’शी संवाद साधला. 

बापट म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक विकासकामे आणि योजनांची अंमलबजावणी केल्याने देशपातळीवर निर्विवाद बहुमत मिळाले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींसारखे चांगले काम केले. गेल्या ५० वर्षांत ज्या योजना केल्या नव्हत्या अशा योजना राज्य सरकारने आणल्या. यातून महिला, मागासवर्गीय, शेतकरी यांना भरपूर लाभ झाला. उज्वला गॅस योजनेमुळे खेड्यांतील महिलेला गॅस मिळाला. आयुष्यमान भारत योजनेमुळे उपचार घेता आलेल्या सामान्य नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान केले. नगरसेवक, आमदार, मंत्री म्हणून मी पुण्यात ४५ वर्षांपासून राजकारण करत आलो आहे. मंत्रिपद हे कायमस्वरूपी नाही. कार्यकर्ते, लोकांशी संपर्क आवश्‍यक आहे. त्यामुळे मी सतत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत गेलो. नागरिकांच्या संपर्कात राहून माझी प्रतिमा चांगली राहिल्याने मला पुणेकारांनी मतदान केले.’’

खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर पुण्यासह राज्याच्या विकासासाठी मोठा निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कचरा, पाणीपुरवठा, वाहतूक या समस्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. हे प्रश्‍न सोडवून पुण्याचा विकास करणार.असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पुण्यातील सर्व विकास प्रकल्प केवळ कागदांवर ठेवून ते रखडवले गेले; परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्यातील मेट्रो, विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, २४ बाय ७ पाणीपुरवठा, वाहतूक प्रश्‍न सोडविण्याचे काम करून विकासाला हातभार लावला. यामध्ये महापौर, नगरसेवक, आमदार, खासदारांनी सहकार्य केले. पक्षसंघटनेनेही केलेली कामे घरोघरी जाऊन पुणेकरांपर्यंत पोचवली. त्यांनी सतर्कतेने कामे केल्याने माझा विजय झाला, असेही ते म्हणाले.

पुण्यासाठी बापट यांचा प्राधान्यक्रम 
  वाहतुकीचा प्रश्‍न सोडविणार 
  मेट्रोचे विस्तारीकरण, विमानतळ, रिंगरोड मार्गी लावणार
  पीएमपीचे सक्षमीकरण करण्यास कटिबद्ध 
  शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला गती देणार
  पीएमआरडीए, महापालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com