निवडणूक मित्र वाढविणार मतदानाचा टक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

राजगुरुनगर - ‘आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारने चंग बांधला आहे. त्यासाठी खेड मतदारसंघात प्रत्येक गावात एक समिती बनविण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक गावासाठी एक ‘निवडणूक मित्र’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक क्षेत्रीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आला असून तो मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविणार आहे,’’ अशी माहिती खेडचे सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  

मतदार नोंदणी, मतदानप्रक्रिया अधिक चांगली व्हावी आणि सरकार, मतदार, ग्रामस्थ यांच्यात समन्वय राहावा यासाठी गावपातळीवर एक समिती नेमण्यात येणार आहे. मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार आहे. विशेषतः महिलांचा मतदार यादीत समाविष्ट करण्याची आणि स्थलांतरित अथवा मृत मतदारांना यादीतून वगळण्याची काळजी घेतली जाणार आहे. नवीन मतदारांसाठी प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले जाणार आहे.  

प्रत्येक गावात एक निवडणूक मित्र नेमण्यात येणार आहे. हा मित्र कोणत्याही राजकीय पक्षाचा असणार नाही. मतदान केंद्र, मतदान प्रक्रिया इत्यादी बाबींवर तो लक्ष ठेवून सहकार्य करणार आहे. 

सध्या मतदान केंद्रांची सुसज्जता तपासली जात असून कुंपण, छत, दरवाजे, पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, स्वच्छतागृह, योग्य मैदान या बाबींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी अडचणी असल्यास त्या दूर केल्या जाणार आहेत. एका मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार नसतील याची काळजी घेतली जाणार आहे. गर्भवती महिला, वृद्ध, दिव्यांग यांना मतदानासाठी आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

तीन महिन्यांत ९ हजार मतदार वाढले 
खेड तालुक्‍यात गेल्या पंचवार्षिकला २ लाख ८२ हजार मतदार होते. या वेळी ३ लाख १६ हजार मतदार झाले असून अजूनही मतदार नोंदणी सुरू आहे. गेल्या ३ महिन्यांत ९ हजार मतदार नोंदले गेले आहेत. तालुक्‍यात ३७७ मतदानकेंद्रे आहेत. विशेषतः मतदारांना नवीन आणि रंगीत मतदान कार्ड मिळणार आहे.

निवडणूक मित्र यापैकी एक असेल
 पत्रकार
 निवृत्त अधिकारी 
 माहिती अधिकार कार्यकर्ता   
 बचत गट, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आदींचा प्रतिनिधी 

हे असणार गाव समितीत 
 ग्रामसेवक, 
 तलाठी, 
 कृषी सहायक, 
 आरोग्य अधिकारी, 
 अंगणवाडी सेविका, 
 मुख्याध्यापक, 
 वायरमन, 
 पोलिस कर्मचारी

Web Title: Election Voter Percentage