शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणूक शांततेत पार पडेल : एस. हरिकिशोर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्‍या टप्‍प्यात होत असून 29 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांच्‍या मनात असलेल्‍या शंकांची उत्‍तरे निवडणूक निरीक्षक एस. हरिकिशोर यांनी दिली.

पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणूक शांततेत आणि पारदर्शी वातावरणात पार पडेल, असा विश्‍वास केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस. हरिकिशोर यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवडणूक लढविणारे उमेदवार, त्‍यांचे प्रतिनिधी यांची सभा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे समन्‍वय अधिकारी अजित रेळेकर आदी उपस्थित होते.

''शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्‍या टप्‍प्यात होत असून 29 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांच्‍या मनात असलेल्‍या शंकांची उत्‍तरे निवडणूक निरीक्षक एस. हरिकिशोर यांनी दिली. जिल्‍ह्याला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असून येथील लोकसभा निवडणुका स्‍वच्‍छ,पारदर्शी वातावरणात पार पडतील'', असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. निवडणूक निर्णय अधिकारी काळे यांनी उमेदवारांच्‍या प्रश्‍नांना समर्पक उत्‍तरे दिली. निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सूचना, आदेश यानुसार मतदार संघात स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, आदर्श आचार संहिता कक्ष यांचे काम चालू आहे. वृत्‍तपत्रातील पेड न्‍यूजबाबतही एमसीएमसी कक्ष लक्ष ठेवून आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे समन्‍वय अधिकारी अजित रेळेकर यांनी प्रचारासाठी करण्‍यात येणा-या खर्चाबाबत मार्गदर्शन केले. उमेदवारांनी विहीत केलेल्‍या मुदतीत खर्च सादर होईल, याची दक्षता घ्‍यावी, असे त्‍यांनी सांगितले. बैठकीस मिडीया सेंटरच्‍या समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, जिल्‍हा नियंत्रण कक्ष व सी-व्‍हीजीलचे सुरेश जाधव, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी,  उप जिल्‍हाधिकारी समीक्षा चंद्राकार आणि इतर उमेदवार, त्‍यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Web Title: Elections in Shirur Lok Sabha constituency will be peaceful: S. Harikishore