निवडणुकीत ‘पंचतारांकित’ संस्कृती

संदीप घिसे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी होत असत. मात्र सध्या कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त झाल्याने बैठकीची तयारी कोण करणार, असा प्रश्‍न राजकीय पक्षांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच आलिशान किंवा पंचतारांकित हॉटेलचा पर्याय निर्माण झाल्याने शहरातील बहुतांश राजकीय पक्षांच्या बैठका आता मोठ्या थाटात होताना दिसत आहेत.

पिंपरी - पूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी होत असत. मात्र सध्या कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त झाल्याने बैठकीची तयारी कोण करणार, असा प्रश्‍न राजकीय पक्षांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच आलिशान किंवा पंचतारांकित हॉटेलचा पर्याय निर्माण झाल्याने शहरातील बहुतांश राजकीय पक्षांच्या बैठका आता मोठ्या थाटात होताना दिसत आहेत.

पूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकी म्हटल्या, की पक्षातील प्रमुख कार्यकर्ते कामाला लागत. ज्यांच्या घरी बैठक असेल, तिथे चहापाण्याची व्यवस्था केली जात असे. त्यानंतर राजकीय पक्षांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली. कार्यकर्त्यांचे घर अपुरे पडू लागल्याने मंगल कार्यालयाचा पर्याय पुढे आला. मात्र बैठकीची तयारी करण्यासाठी कार्यालय बुक करणे, बैठकीसाठी पक्षाचा बॅनर तयार करणे, ध्वनिक्षेपक व खुर्च्यांची ऑर्डर देणे, त्या व्यवस्थित लावून घेणे अशी कामे करावी लागत. मात्र आता कार्यकर्ते कमी आणि नेतेच जादा झाल्याने काम करण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही.

सभेसाठी येणारे नेते सभेच्या ठिकाणापासून जवळपास एखादे मोठे हॉटेल पाहून उतरत असत. आता शहरात तारांकित हॉटेलांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा कल आलिशान हॉटेलकडे वाढला आहे. बैठकीसाठी येणारा नेता येथील एका खोलीमध्ये विसाव्याकरिता थांबतो. मग तेथूनच राजकीय खलबते आणि गुप्त बैठका होतात. या हॉटेलची सुरक्षा चोख  असल्याने इतर कोणीही त्या नेत्याशी थेट संपर्क साधू शकत नाही. याशिवाय खानपानाची वेगळी व्यवस्था करावी लागत नाही.

पंचतारांकित हॉटेल म्हटले, की त्याचे बिलही तसेच येणार. मात्र राजकीय पक्षांना सध्या बिलाची चिंता नाही. एखादे काम दिलेला ठेकेदारच या पंचतारांकित  हॉटेलचे बिल भरत असल्याचे वास्तव आहे. ठेकेदाराने असा खर्च केला तर यापुढील काळातही त्याला काम मिळण्याची शक्‍यता असते. यामुळे राजकीय पक्षांवर हॉटेलच्या बिलाचा भार येत नाही. याशिवाय पंचतारांकित हॉटेलमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न पंचतारांकित हॉटेल चालक देताना दिसतात.

पूर्वी नेत्यांचा कार्यकर्त्याच्या घरी चुलीपर्यंत संपर्क होता. त्यामुळे त्यांच्यात आपुलकी होती. आपल्या नेत्यांच्या विजयासाठी ते रात्रीचाही दिवस करीत असत. आता मात्र सर्वच पक्षात कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त झाले असल्याने बैठकीची तयारी करणार तरी कोण, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने राजकीय पक्ष बैठकांकरिता पंचतारांकित हॉटेलकडे वळत आहेत.
- मधू जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते, भाजप

Web Title: Elections Star culture