वीजबिलाचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पिंपरी - उन्हाळ्यामुळे इलेक्‍ट्रिक उपकरणांचा वाढलेला वापर आणि महावितरणने एप्रिलपासून केलेली दरवाढ यामुळे ग्राहकांना वीजबिल वाढीचा झटका बसला आहे. घरगुती वीज वापरासाठी पूर्वी महावितरणचा दर प्रतियुनिट तीन रुपये होता. त्यामध्ये आता सात ते दहा पैशांची वाढ झाली आहे. तसेच, स्थिर आकार पाच रुपयांनी वाढल्याने वर्षाला ६० रुपये जादा रक्कम मोजावी लागणार आहे. तसेच, जादा अनामत रकमेची आकारणी महावितरणने सुरू केल्याने त्याचा बोजाही ग्राहकांना सोसावा लागत आहे. 

उन्हाळ्यामध्ये पंखे, कूलर, एसी, फ्रिज आदी  इलेक्‍ट्रिक उपकरणांचा वापर वाढतो. त्यामुळे मे व जून महिन्याची वीजबिले सरासरीपेक्षा अधिक रकमेची येतात, हा नेहमीचा अनुभव. मात्र, वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार एक एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू झालेली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी ० ते १०० युनिटसाठी तीन रुपये सात पैसे दर लावलेला आहे. एप्रिलपूर्वी हाच दर तीन रुपये होता. १०१ पेक्षा अधिक युनिट वापरासाठीही दरवाढ झालेली आहे.

तसेच, स्थिर आकार ६० वरून ६५ रुपये लागू झालेला आहे. त्यामुळे अधिक रकमेची बिले ग्राहकांच्या हाती पडली आहेत. त्यातही कोणतेही बिल ३० दिवसांचे व शंभर युनिटपर्यंतच्या वीज आकाराचे अपेक्षित असताना ३० पेक्षा कमी कालावधीचे व शंभर ऐवजी ९० युनिटला तीन रुपये सात पैसे व त्यावरील युनिटला सहा रुपये ८१ पैसे म्हणजेच वरच्या दहा युनिटसाठी तब्बल दुपटीपेक्षा अधिक रकमेचा वीजदर द्यावा लागत आहे.

महावितरणकडून मे महिन्यात वाढीव रकमेची बिले आलेली आहेत. त्याचा घरगुती ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. वीजचोरी रोखण्याऐवजी वीजदरवाढ करून प्रामाणिक ग्राहकांकडून जादा रक्कम वसूल केली जात आहे, असे  गॅस-टेलिफोन-वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Electric bill Shock to consumer