महावितरणचे बिल ‘स्मार्ट’ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पुणे - महावितरणचे वीजबिल नवा चेहरा घेऊन, वीजग्राहकांकडे आले आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत सुटसुटीत तसेच रंगसंगतीतही आकर्षक आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत बारकोडपेक्षाही क्‍यूआर कोडचा समावेश बिलामध्ये करण्यात आला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते. 

पुणे - महावितरणचे वीजबिल नवा चेहरा घेऊन, वीजग्राहकांकडे आले आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत सुटसुटीत तसेच रंगसंगतीतही आकर्षक आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत बारकोडपेक्षाही क्‍यूआर कोडचा समावेश बिलामध्ये करण्यात आला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते. 

मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील क्‍यूआर कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल ॲपची लिंकही मिळते. वीजबिलावरील क्‍यूआर कोड हा अँड्राइड, आयओएस, विंडोजसाठी उपलब्ध आहे. मोबाईल ॲपमुळे महावितरणची ग्राहकसेवा एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे.

आतापर्यंत ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप डाउनलोड केले आहे.

मोबाईल ॲपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येणे शक्‍य झाले आहे. तसेच चालू व मागील बिल पाहणे, बिलभरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे. भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येतो. वीज सेवेसाठी ॲपमध्येच टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा मिळू शकते.

त्याचप्रमाणे वीजग्राहकांना महावितरणच्या अन्य सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्ययावत करण्याची सोय आहे. हे मोबाईल ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून, ‘अँड्राइड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटिंग सिस्टिमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटसह गुगल प्ले-स्टोअर, ॲपल ॲप स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करता येते.

Web Title: electricity bill smart