पुणेकरांनो, वीजबिलाबाबत काळजी नसावी कारण...

मंगळवार, 30 जून 2020

स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा व बिलाबाबत काळजी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

पुणे : लॉकडाउनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाउनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा व बिलाबाबत काळजी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान, जूनमध्ये मीटर रिडींगनुसार देण्यात येणारी वीजबिले अचूकच आहे. केवळ मीटर रिडरकडून अनवधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

लॉकडानउनमुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकलेल्या वीजग्राहकांना मागील तीन महिन्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. मात्र जून महिन्यात मीटर रिडींगची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे मार्चपासून ते जूनपर्यंत वीजवापरांची एकूण युनिट संख्या ही जूनच्या वीजबिलात नोंदविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात ही युनिट संख्या केवळ जून महिन्याची नाही तर लॉकडाउनच्या कालावधीमधील सुमारे 90 ते 97 दिवसांची आहे. या युनिट संख्येला तीन महिन्यांनी विभागून स्लॅबप्रमाणे 31 मार्चपूर्वीच्या व 1 एप्रिलनंतरच्या वीजदरानुसार बिलांची आकारणी करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी आकरणी करण्यात आली आहे- 
समजा जूनच्या बिलामध्ये एकूण 612 युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. तर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 204 युनिटचा वापर झाला आहे असा हिशेब करून त्यातील पहिल्या 100 युनिटला 0 ते 100 आणि दुसऱ्या 104 युनिटला 101 ते 300 युनिट स्लॅबनुसार वीजदर लावण्यात येत आहे. यामध्ये आकारणी करण्यात आलेल्या एकूण रकमेत एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल भरलेले आहे असा हिशेब करून फिक्‍स चार्जेस व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित भरलेली रक्कम वजा करण्यात येत आहे. मात्र एप्रिल किंवा मे महिन्याचे बिल ग्राहकांनी भरलेले नसल्यास ते थकबाकी म्हणून दाखविण्यात येत आहे. याबाबतचा संपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. 

सुलभ हप्त्याची सोय- 
वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे. मात्र 2019 मधील एप्रिल ते जूनच्या कालावधीतील वीजवापराचा विचार केल्यास यंदाच्या एप्रिल ते जूनपर्यंत तेवढाच वीजवापर झाल्याचे दिसून येत आहे. जूनमध्ये मागील दोन महिन्यांच्या युनिटच्या बिलाची रक्कम लावली असल्याने हे वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.