स्मार्ट‌ पुणेकर करणार स्मार्ट ई बसमधून प्रवास! कशा आहेत नव्या ई बस?

bus
bus

पुणे : शिष्टाचार बाजूला ठेवून बसने प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्मार्ट ई-बसचे उद्घाटन करण्यात आले. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने स्मार्ट मोबिलिटीच्या अंतर्गत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात नव्याने 50 स्मार्ट ई-बस दाखल करण्यात आल्या. तसेच पीएमपीच्या 50 सीएनजी बसदेखील यावेळी ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसून पाहणी केली व या बसच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती घेतली.
 
स्मार्ट इलेक्ट्रिक बसच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी 9 मीटर लांबीच्या नॉन-बीआरटी 25 एसी इलेक्ट्रिक बस, 12 मीटर लांबीच्या 125 बीआरटी एसी इलेक्ट्रिक बस असतील. पहिल्या टप्प्यातील 25 बसची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर आणखी बस दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर 50 सीएनजी बससुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुणेकरांची वाहतूक सुखकर होण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने स्मार्ट ई-बसच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीचे प्रयत्न साह्यभूत ठरतील.”

“शहराच्या विविध भागांत राबविण्यात येणारे स्मार्ट सिटीचे प्रकल्प पुणेकरांना दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरतील,” असे खासदार गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांनी यावेळी सांगितले.

पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञानाने युक्त स्मार्ट ई-बसने प्रवास करून प्रत्येक पुणेकराने आवर्जून या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे.” तसेच, ‘स्मार्ट मोबिलिटीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ई-बस व अशा इतर स्मार्ट प्रकल्पांमुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसह इतर संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगताप म्हणाले, “पुणे शहरात विविध पायाभूत सुविधांचा स्मार्ट विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेसह इतर शासकीय संस्थांचे सहाय्य व समन्वयातून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. स्मार्ट ई-बस प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे.”

स्मार्ट ई-बसची ठळक वैशिष्ट्ये
- जुन्या बसच्या तुलनेत 9 मीटर नॉन-बीआरटी बसेसने महसुलात 10 ते 20% वाढ प्राप्त केली
- प्रदूषणावर सकारात्मक परिणाम : शून्य वायू उत्सर्जनामुळे - स्वच्छ पर्यावरणास मदत 
ध्वनी प्रदूषण नाही, कंपने (व्हायब्रेशन) नाहीत, धक्के जाणवत नाहीत
- ब्रेकडाऊन नाही, त्यामुळे ऐनवेळी ट्रिप रद्द होत नाहीत 
- जनतेकडून मोठा प्रतिसाद व वाढती मागणी
- वाढीव शुल्क न आकारता वातानुकूलित बस सेवा
- डिजिटल फलकांमुळे प्रवाशांना योग्य बस पकडणे सुलभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com