वीजजोडणीसाठी एजंटांना थारा देऊ नका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोड व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सिंगल व थ्री फेजचे १ लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या आणि नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोड व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सिंगल व थ्री फेजचे १ लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या आणि नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडे मीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मागणी केल्यानंतरही मीटर उपलब्ध होण्यास वेळ लागत होता. परिणामी, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, महावितरणकडे मोठ्या प्रमाणावर वीजमीटर उपलब्ध झाले आहेत. असे असतानाही तुटवडा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महावितरणकडून ही माहिती देण्यात आली आहे. महावितरणकडून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  महावितरणने वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाइटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्‍यक कागदपत्रे व लागणाऱ्या शुल्काची माहिती उपलब्ध आहे. 

ऑनलॉइन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थितीही ग्राहकांना स्वतः वेबसाइटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते. वीजग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी थेट संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: electricity connection agent