कॅमेऱ्यांसाठी तब्बल १३ कोटी

कॅमेऱ्यांसाठी तब्बल १३ कोटी

पुणे - जलपर्णी, महागडी झाडे यांच्या वादग्रस्त निविदांवरून वाभाडे निघत असतानाच नागरिकांच्या सुरक्षिततेचा आव आणून, महापालिकेच्या विद्युत खात्याने ‘सीसीटीव्ही’साठी तब्बल १३ कोटींच्या निविदा काढण्यात येत आहेत. या योजनेसाठी ६ कोटी रुपये राखून ठेवले असता निविदा मात्र १३ कोटींच्या निघत आहेत. नियंत्रण कक्ष न उभारताच ठेकेदारांसाठी कॅमेरे खरेदी करीत असल्याचे उघड झाले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी एकत्रित कंट्रोल रूम उभारणे अपेक्षित असतानाही ‘सीसीटीव्ही’तील फुटेज तपासण्याचे अधिकार त्या त्या इमारतींमधील सुरक्षारक्षकांकडे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खरोखरीच योजनेचा उद्देश साध्य होणार, की कोट्यवधींच्या निविदा काढणाऱ्या अधिकारी-प्रशासनाचा, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

महापालिकेच्या शाळा, इमारती, हॉस्पिटल आणि उद्यानांत येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एकत्रित निविदा काढण्याऐवजी ठराविक ठेकेदारांना कामे देण्यासाठी जवळपास ३२ हून अधिक निविदा काढल्या आहेत. त्यातही कॅमेऱ्यांची संख्या, किमत, दर्जा, आणि क्षमता याकडे पूर्णपणे काणाडोळा करण्यात आला आहे. तरीही राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कॅमेरे बसविण्यात येतील, असे सांगून अधिकारी मोकळे होत आहेत.  

तपशील न ठरवताच निर्णय
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता  सुधारण्यासाठी आखलेल्या योजना रखडल्या आहेत. उद्यानांची अवस्थाही फारशी चांगली नाही. महापालिकेच्या रुग्णालयांत सेवा-सुविधा अपुऱ्या आहेत. महापालिकेच्या इमारतींमध्ये नेमलेले सुरक्षारक्षकच गायब असतात. त्यामुळे आहे ती यंत्रणा सक्षम करण्याऐवजी केवळ खाबुगिरीसाठी ‘सीसीटीव्ही’ची योजना राबविण्यात येत आहे. ती कशी राबवायची, हे न ठरविताच निविदा काढण्यात आल्या. कागदोपत्री पारदर्शकता दाखवून संपूर्ण कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहेत. याआधी कॅमेरे बसविले आहेत, त्याची स्थिती काय हे एकाही अधिकाऱ्याला सांगत येत नाही.

क्षेत्रीय कार्यालयांकडूनही निविदा 
शहराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘सीसीटीव्ही’ची योजना आहे. आतापर्यंत त्यासाठी १ ते दीड कोटींची तरतूद असायची. मात्र २०१८-१९च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल ६ कोटी रुपये देण्यात आले होते. त्याप्रमाणातच निविदा काढणे अपेक्षित असताना जलवळपास १३ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. या खात्याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयांनीही याच कामांसाठी निविदा काढल्याचे विद्युत खात्यातील अधिकाऱ्यांनीच सांगितले.

महापालिकेच्या इमारतींसह शाळा, दवाखाने आणि उद्यानांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. शिवाय, पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार काही रस्त्यांवर कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी ३० ते ३२ निविदा काढल्या आहेत.
- श्रीनिवास कंदुल,  प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com