टेमघर धरणावर वीजनिर्मिती सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

टेमघर धरणाच्या पायथ्याशी उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून वर्षातील सुमारे १८० दिवस वीजनिर्मिती होणार आहे. एकूण चार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
- प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ

पुणे - टेमघर धरण प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापासून चार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे आता पानशेत, वरसगावनंतर टेमघर प्रकल्पातूनही वीजनिर्मितीस प्रारंभ झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर हे एक धरण आहे. त्याची क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यातून पाण्याची गळती मोठी होत होती. त्यामुळे दोन वर्षांपासून दुरुस्तीचे काम सुरू होते. यंदा प्रथमच टेमघर धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर धरणातून खडकवासला धरणात 
पाणी सोडले जाते. धरणातून 

सोडण्यात येणाऱ्या पाण्यापासून वीजनिर्मितीचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यासाठी बीओटीवर निविदा मागविण्यात येऊन या प्रकल्पाचे काम दिले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या उभारणीनंतर तेथे पॉवर हाउस बांधले. या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. 

टेमघरच्या पायथ्याशी वीजनिर्मिती केंद्र उभारले आहे. याठिकाणी एक मेगावॅटचे चार संच उभारण्यात येणार आहेत. एकूण चार मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. यातून निर्माण होणारी वीज संबंधित ठेकेदार कंपनीकडून नॅशनल ग्रीडला जोडली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity generation on emghar dam