उद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहे. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहे. 

औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार महेश लांडगे यांनी महावितरणचे अधिकारी, लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या वेळी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, सुरेश म्हेत्रे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. 

औद्योगिक परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. बऱ्याचदा या ठिकाणी ’ओव्हरवेड’ वायर तुटून, कमी क्षमतेच्या ‘ट्रान्सफार्मर’वर जादा भार दिल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. 

ट्रान्सफार्मर ओव्हरलोड झाले असून त्या ठिकाणी जादा क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. ओव्हरहेड वायर लोंबकळत असल्यामुळे उंचीच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्या खालून जाता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असून, सर्व ठिकाणी ओव्हरहेड वायर काढून भूमिगत केबल टाकून वीजपुरवठा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. 

कुदळवाडी, चिखली परिसर, मोई, चाकण फीडरला जोडल्यामुळे या परिसरातील हजारो उद्योगांना चार ते आठ तास सक्तीचे भारनियमन सहन करावे लागते. त्यामुळे कुदळवाडी, चिखली परिसर टेल्को फीडरला तातडीने जोडण्यात यावा, अशी सूचना आमदार लांडगे यांनी दिली; तसेच उद्योजकांना वीज मीटर उपलब्ध करून देण्यात यावेत, तळवडे औद्योगिक परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील देवी इंद्रायणी सब स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू करावे, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर केबलचे साहित्य देण्यात यावे, असेही लांडगे यांनी सांगितले.

Web Title: electricity problem to PCMC industry says Mahesh Landge