रेखाकला परीक्षेच्या २८ लाख प्रश्‍नपत्रिकांची रद्दी

intermediate-Drawing
intermediate-Drawing

पुणे - कला संचालनालयाने रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेसाठी सर्व विषयांच्या २८ लाखांपेक्षा जास्त प्रश्‍नपत्रिका छापून तयार ठेवल्या आहेत. मात्र, अचानक ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचा निर्णय घेतल्याने या छापील प्रश्‍नपत्रिकांची रद्दी झाली आहे. शिवाय लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.

कला संचालनालयातर्फे सप्टेंबरमध्ये रेखाकला परीक्षा घेतली जाते. यात एलिमेंटरी व इंटरमिजिएटचे प्रत्येकी चार विषय असतात. यंदा एलिमेंटरीसाठी ३ लाख ३० हजार व इंटरमिजिएटसाठी ३ लाख ८७ हजार असे ७ लाख १७ हजार विद्यार्थी बसले आहेत. ही परीक्षा २६ ते २९ सप्टेंबर या दरम्यान होणार होती. त्याच्यासाठी त्या प्रश्‍नपत्रिकांचे संच वाटप झाले होते; पण २४ सप्टेंबर रोजी तांत्रिक कारण समोर करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या व प्रश्‍नपत्रिका जमा करण्याचे आदेश दिले. 

कला संचालनालयाने त्यानंतर परीक्षेची पुढची तारीख १४ ते १७ नोव्हेंबर निश्‍चित केली होती, ती परत रद्द करत २७ ते ३० नोव्हेंबर अशी निश्‍चित केली; पण त्यासाठी परीक्षेच्या दोन तास आधी ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका संच केंद्रावर पाठविला जाईल, असे सांगितले. राज्यातील अनेक शाळेत वीज, इंटरनेट, संगणक, प्रिंटर, झेरॉक्‍स मशिन नाही. त्यामुळे एवढ्या कमी काळात ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका संच पाठविणे योग्य नाही. पुढच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कला शिक्षकांनी कला संचालक राजीव मिश्रा यांच्याकडे केली होती. मात्र, ही मागणी अमान्य करत यंदापासूनच याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले. ८ नोव्हेंबर रोजी सर्व केंद्र प्रमुखांना त्यांच्या ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका पाठविण्यासाठी केंद्राची संपूर्ण माहिती, ईमेल आयडी, बॅंक खाते क्रमांक देण्याच्या सूचना केल्या आहेत.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका संचाची छपाई झाली असली तरी, ऑनलाइन प्रश्‍नसंच केंद्रावर पाठवू. पेपर फुटीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे ऑनलाइनचा निर्णय घेतला आहे.
- राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय

परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका पाठविली जाणार आहे. त्याच्या प्रिंट काढण्याचा खर्च शाळांना दिला जाईल. छापलेल्या प्रश्‍नपत्रिकांवर समिती निर्णय घेईल. 
- नागेश वाघमोडे, परीक्षा नियंत्रक, कला संचालनालय

ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार होते, ते दिलेले नाही. तयारी नसताना अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे परीक्षेत गोंधळ झाला तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. 
- एक कला शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com