एलिव्हेटेड रस्त्याचा मुहूर्त हुकला 

एलिव्हेटेड रस्त्याचा मुहूर्त हुकला 

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचे (एचसीएमटीआर) भूमिपूजन जूनअखेर करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. यासाठीच्या निविदा अजूनही छाननी प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे त्या स्थायीला सादर होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अजून बराच अवधी लागेल, अशी चिन्हे आहेत. 

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उपनगरांमधून वर्तुळाकार मार्गाची आखणी १९८७ च्या विकास आराखड्यात करण्यात आली आहे. २००७ च्या विकास आराखड्यात तो कायम ठेवण्यात आला आहे. हा रस्ता प्रत्यक्षात साकारण्यासाठी २०१९ उजाडले आहे. मात्र प्रशासकीय कूर्मगतीमुळे रस्ता साकारण्याचा वेग मंदावला आहे. पीएमपीसाठी २५ ई-बस आणि २०० मिडी बस लोकार्पण सोहळ्यात ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जूनमध्ये एचसीएमटीआर रस्त्याचे भूमिपूजन करायचे असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पदाधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. तसेच हे भूमिपूजन वेळेत व्हावे, यासाठी मी स्वत- बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.

असा असेल ‘एचसीएमटीआर’
  बोपोडी, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, पौड फाटा, कर्वे रस्ता, दत्तवाडी, सारसबाग, स्वारगेट, नेहरू रस्ता, लुल्लानगर, वानवडी, रामवाडी, मुंढवा, वडगाव शेरी, विमाननगर आणि विश्रांतवाडी  
  लांबी - ३६ किलोमीटर        रुंदी - २४ मीटर 
  ६ लेनचा रस्ता - मध्यभागातील दोन लेन बीआरटीसाठी राखीव 
  मोटारी, जड वाहने आणि बससाठी हा मार्ग खुला राहणार 
  सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च        ३ वर्षांत पूर्ण होणार 
  संपूर्ण रस्ता एलिव्हेटेड पद्धतीने उभारला जाणार

एचसीएमटीआरसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. दोन राष्ट्रीय कंपन्यांनी त्या भरल्या आहेत. या निविदांची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ती पूर्ण होईल. 
-अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com