#HealthIssues ‘सबका विकास’ सोडल्यानेच ससूनची इमारत अधांतरी

योगीराज प्रभुणे
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे - ‘सबका साथ सबका विकास’ची हाक देणाऱ्या राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून फक्त आपल्या जिल्ह्याचा जोमाने विकास सुरू असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीची निविदा मान्यतेअभावी रखडली असताना, या मंत्र्यांकडून मात्र त्यांच्या जळगाव जिल्ह्यात निधीची खैरात केली जात असल्याचे समोर आले आहे. 

# हेल्थइश्‍यू

पुणे - ‘सबका साथ सबका विकास’ची हाक देणाऱ्या राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून फक्त आपल्या जिल्ह्याचा जोमाने विकास सुरू असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीची निविदा मान्यतेअभावी रखडली असताना, या मंत्र्यांकडून मात्र त्यांच्या जळगाव जिल्ह्यात निधीची खैरात केली जात असल्याचे समोर आले आहे. 

# हेल्थइश्‍यू

एक केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, आठ आमदार, तीन खासदार भाजपचे असताना येथील ससून रुग्णालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी अवघ्या ६५ कोटी रुपयांच्या कामाच्या प्रस्तावास मान्यता मिळत नाही. ही मान्यता वेळेत मिळाली, तर पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. असे असतानाही चार वर्षे झाले तरी प्रस्तावास मान्यता मिळत नाही. त्यासाठी ‘आम्ही प्रयत्न करीत आहोत’ असा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेला दावा फोल ठरला आहे. या उलट महाजन यांच्याकडून मात्र ससूनसाठी निधी उपलब्ध करून देण्याऐवजी जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी वळविल्याचे समोर आहे. वास्तविक हे विद्यालय नव्याने उभारण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी मोठी तरतूद केली आहे. परंतु, ससूनच्या नवी इमारतीच्या अंतर्गत कामासाठीच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी मंत्री महोदय तयार नाहीत.

यापूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्या सरकारकडून रद्द करण्यात आल्या. आता सुधारित निविदा काढण्याच्या सूचना सचिव समितीकडून देण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या निविदा रद्द करणे आणि सुधारित निविदा काढण्यामागे कोणतीही ठोस कारणे सरकारकडून दिली गेलेली नाहीत. त्यामुळे हे काम अद्यापही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. 

कामांची मान्यता घेण्यातही अपयश
ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीचे काम पूर्ण आहे. परंतु इमारतीमधील इलेक्‍ट्रिकल, गॅस पाइपलाइन, दारे खिडक्‍या, शस्त्रक्रिया कक्ष, ऑक्‍सिजन पाइप लाइन अशा स्वरूपाची कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी ६५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे.  सरकारने या प्रस्तावांना मान्यता दिली असती, तर ही कामे मार्गी लागली असती. त्यासाठीचा निधी हा पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला असता, तरी चालले असते, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या बोलीवर सांगितले. परंतु, या कामांची मान्यता घेण्यातसुद्धा शहरातील नेतृत्वाला यश आले नाही, त्यामुळे हे काम मार्गी लागू शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गटबाजीचा फटका
शहर भाजपातील अंतर्गत राजकारणाचा फटका ससून रुग्णालयाला बसत असल्याचे बोलले जात आहे. ससून समितीवर भाजपचे एक नेते आहेत. त्यांच्या कारकिर्दीत हे काम पूर्ण होऊ नये, यासाठी पक्षातील त्यांचे स्पर्धक असलेल्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच काही नेते या रुग्णालयाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: eleven floor building of Sassoon Hospital tender issue