पुणे जिल्ह्यात अकरा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election

पुणे जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगर पंचायती असे एकूण अकरा नगराध्यक्ष हे आता थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात अकरा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार

पुणे - पुणे जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगर पंचायती असे एकूण अकरा नगराध्यक्ष हे आता थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. यामुळे याआधी जाहीर झालेला या नगरपालिका आणि नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार असून, नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याचे गुरुवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेतून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील नऊपैकी भोर या नगरपालिकेतील तर, वडगाव मावळ नगर पंचायतीतील विद्यमान पदाधिकारी आणि नगरसेवकांचा कार्यकाल अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे भोर येथील विद्यमान नगराध्यक्ष हे थेट जनतेतूनच निवडून आलेले आहेत. त्यामुळे या नगरपालिकेचे नगराध्यक्ष सलग दुसऱ्यांदा जनतेतून निवडले जाणार आहेत. उर्वरित आठ नगरपालिका आणि एका नगर पंचायतीवर सध्या प्रशासकराज आहे. त्यामुळे या संस्थांवरील प्रशासकांना आणखी मुदतवाढ मिळणार आहे.

जिल्ह्यात एकूण तेरा नगरपालिका आणि चार नगर पंचायती आहेत. यापैकी नऊ पालिका, दोन पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाने नगरपालिकांचे नगराध्यक्ष पुन्हा एकदा थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय गुरुवारी (ता.१४) घेतला आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा जाहीर झालेला कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

थेट जनतेतून २८५ सरंपच निवडले जाणार

पुणे जिल्ह्यातील ३०४ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची मुदत संपली आहे. परंतु या ग्रामपंचायतींपैकी सध्या केवळ १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला गुरुवारी रात्री उशिरापर्यंत स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवडणुका पूर्वीप्रमाणे होतील आणि उर्वरित २८५ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जातील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Eleven Mayors Will Be Elected Directly From The People In Pune District Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneelectionmayor