महापालिकेच्या अकरा शाळांमध्ये नववीचे वर्ग भरणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग नाहीत, अशा शाळांमध्ये ते सुरू करण्यासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शहरातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या अकरा शाळांमध्ये नववीचे वर्ग भरणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
स्वयंअर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. 

पुणे - महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग नाहीत, अशा शाळांमध्ये ते सुरू करण्यासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शहरातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या अकरा शाळांमध्ये नववीचे वर्ग भरणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
स्वयंअर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. 

महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये केवळ सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, वारंवार प्रस्ताव देऊनही या शाळांमध्ये आठवी, नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्या त्या भागांतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा शाळांमध्ये नववीपासून पुढील वर्ग सुरू करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरली होती. आवश्‍यकतेनुसार वर्ग सुरू करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात हे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. शाळांमधील अपुऱ्या सुविधा आणि आर्थिक तरतुदीअभावी हे वर्ग सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नवे वर्ग सुरू करण्याची मागणी नगरसेविका आशा साने आणि लक्ष्मी घोडके यांनी केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी महिला व बालकल्याण समितीकडे दिला होता. समितीच्या मंजुरीनंतर तो सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 
याबाबत महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ""महापालिकेच्या काही शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नववीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी दोन शैक्षणिक संस्था आणि चार स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार शाळांची निवड केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराजवळच्या शाळेत दहावीपर्यंचे शिक्षण घेता येईल. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.'' 

या संदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा उषा कळमकर यांनी दिली. 

निवड केलेल्या शाळांमध्ये नवे वर्ग सुरू करण्यासाठी येणारा खर्च स्वयंसेवी संस्था करणार आहेत. त्यात नव्याने नेमण्यात येणारे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि वर्गातील पायाभूत सुविधांवरील खर्चाचा समावेश आहे. या उपक्रमासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असल्या तरी, त्यांच्या कामाची खातरजमा करूनही शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

या आहेत शाळा 
सीताराम आबाजी बिबवे, (कै.) रामचंद्र बनकर, हरिभाऊ पोकळे प्राथमिक शाळा, महापालिका शाळा (क्र. 53, 64,), राजर्षी शाहू महाराज शाळा, सम्राट अशोक विद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर, अनुसयाबाई खिलारे, माधवराव सोनबा तुपे, कस्तुरबा गांधी इंग्रजी माध्यम शाळा. 

Web Title: Eleven municipal schools