अकरावीच्या ३६ हजार जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

प्रवेशफेरीबाबत सोमवारी निर्णय अपेक्षित
असंख्य जागा रिक्त असतानाही प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार घेऊन विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात जात आहेत. आणखी एक प्रवेशफेरी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावर उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण सचिव स्तरावर चर्चा सुरू आहेत. याबद्दल सोमवारी (ता. १४) निर्णय अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ३६ हजार २३७ जागा (३५ टक्के) रिक्त राहिल्या आहेत. सुमारे दोन महिने चाललेल्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे ६७ हजार ९०२ जणांनी प्रवेश घेतले आहेत. आणखी एक प्रवेशफेरी घेण्याची मागणी दोन्ही शहरांतील विद्यार्थ्यांकडून होत आहे.

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली. समितीने ऑनलाइन पद्धतीने तीन नियमित फेऱ्या आणि प्रथम येणारास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील फेऱ्यांसह एकूण सात फेऱ्या घेतल्या होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख चार हजार १३९ प्रवेश क्षमता होती. तेथे प्रवेश घेण्यासाठी ७७ हजार २८० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. या प्रक्रियेतून ५९ हजार १९ जणांनी प्रवेश घेतला.

अल्पसंख्याक कोट्यातून तीन हजार १६७, व्यवस्थापन कोट्यातून दोन हजार २४४ आणि इनहाऊस कोट्यातून तीन हजार ४७२ असे एकूण ६७ हजार ९०२ प्रवेश झाले. उर्वरित जागा मात्र रिक्त राहिल्या आहेत. तरीही आणखी एक प्रवेशफेरी घेण्याची मागणी होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मनासारखे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नसल्याने त्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अकरावीसाठी मागणी कमी आणि स्वयंअर्थसाह्यिक कनिष्ठ महाविद्यालये आणि तुकड्यांची वाढलेली बेसुमार संख्या यामुळे प्रवेश क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये ही सदनिकेत वा अत्यंत छोट्या जागेत चालविली जातात. अशा ठिकाणी प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी ही महाविद्यालये नाकारली आहेत, अशा कनिष्ठ महाविद्यालयांची उपसंचालक कार्यालयामार्फत पाहणी झालेली नाही. यासंदर्भात उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleventh admission 36000 seats empty education