अकरावीसाठी नवा अभ्यासक्रम

Education
Education

पुणे - दहावीपाठोपाठ आता अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेत मूल्यमापनासाठी कृतिपत्रिका असेल. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी, विषय आणि संकल्पनांचे अधिकाधिक आकलन होण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जूनपासून नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्याची पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम ‘बालभारती’मध्ये सुरू आहे. त्याचा मसुदा तयार झाल्यानंतर सुरवातीला या पाठ्यपुस्तकांची तज्ज्ञांकडून समीक्षा केली जाणार आहे. त्यांचे आक्षेप, हरकती याची नोंद घेऊन त्यांच्या सूचनेनुसार पाठ्यक्रमात बदल केला जाईल. त्यानंतरच नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्‍यक असलेल्या गणित, विज्ञान या विषयांची रचना त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा समोर ठेऊन करण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्याला संकल्पनांचे आकलन किती झाले, हे तपासले जाते. तसे बदल विविध विषयांमध्ये करण्यात आले आहेत. यापूर्वी विषयांची मांडणी करताना इतिहास आणि सैद्धांतिक रचनेवर भर दिला जात होता. ती पद्धत नव्या अभ्यासक्रमात नसेल.

विद्यार्थ्याची तार्किक आणि विश्‍लेषणाची क्षमता वाढावी हा हेतू नव्या रचनेमागे असून, धड्याखालील प्रश्‍नांनाही फार महत्त्व नसेल. त्यामुळे संकल्पनांचे आकलन करून घेणे किंवा ‘केस स्टडी’द्वारे विषय समजून घेणे, असे बदल या अभ्यासक्रमांमध्ये केलेले आहेत. नव्या अभ्यासक्रमामुळे समीक्षा समितीच्या बैठका जानेवारीत आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या आता मार्च महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच पुस्तकांची छपाई सुरू होईल, असे ‘बालभारती’तील सूत्रांनी सांगितले.

अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे काम सुरू आहे. त्यातील तपशिलांचा खासगी प्रकाशनांकडून गैरवापर होऊ नये म्हणून सध्या अभ्यासक्रम गोपनीय ठेवला आहे. परंतु, समीक्षा झाल्यानंतर तो सर्वांसाठी खुला केला जाईल.
- डॉ. सुनील मगर , संचालक, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ

विद्यार्थ्याला विषयाचे सखोल आकलन व्हावे, संकल्पनांचे उपयोजन समजावे आणि विषयांची आवड निर्माण व्हावी, याचा विचार अभ्यासक्रमांची रचना करताना केलेला आहे. दहावीप्रमाणेच नव्या अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा तयार होईल.
- शिरीषा साठे, अध्यक्ष, मानसशास्त्र अभ्यास मंडळ

प्रवेश परीक्षांची अधिक तयारी होण्यावर भर
विषय, संकल्पनांच्या आकलनबाबत विचार
विश्‍लेषण क्षमता वाढविण्याचा हेतू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com