
एलॉन मस्क यांचा पुणेरी मित्र
पुणे - पुणे तिथे काय उणे असं कायमचं म्हटलं जाते, हे अगदी खरंय. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आलीय. होय, पुण्यातील एका २३ वर्षीय तरुणाची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या एलॉन मस्क यांच्याशी थेट मैत्री जमलीयं. आश्चर्य वाटतयं ना! अहो, पण हे अगदी खरं आहे.
पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या प्रणय पाटोळे या तरुणाने ही अनोखी मैत्री केली आहे. प्रणय सध्या एका नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हल्पर म्हणून काम करत आहे. प्रणय याने २०१८मध्ये एक ट्विट केलं होते. त्यात टेस्लामधील काही फिचरबाबत लिहिले होते. त्याच्या या ट्विटला दस्तुरखुद्द एलॉन मस्क यांनी प्रतिसाद (रिप्लॉय) दिला होता. त्यानंतर प्रणय याने टेस्ला, नवीन तंत्रज्ञान याबाबत ट्विटरद्वारे विचारलेल्या प्रश्नांना, शंकांना एलॉन मस्क हे ‘रिप्लॉय’ करत मनमोकळी उत्तरे देत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून या दोघांमध्ये अशी अनोखी मैत्री झाली आहे.
प्रणयने शालेय शिक्षण औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून (एआयएसएसएमएस) कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतले. सध्या तो हिंजवडी येथील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आहे. लवकरच तो पुढील शिक्षणासाठी म्हणजेच ‘मास्टर्स’ करण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे. त्याला डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (अर्टिफिशनल इंटेलिजन्स) यात पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यायचे आहे.
‘जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असण्याबरोबरच सर्वाधिक बुद्धिमान असणाऱ्या आणि भविष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या एलॉन मस्क यांच्याशी ट्विटरच्यानिमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांच्याशी चर्चा करताना अगदी सहजपणे ते उत्तरे देत असतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहेत. मला डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयात मास्टर्स करायचे आहे. त्यासाठी अमेरिकेला जाणार आहे. त्याठिकाणी मस्क यांची प्रत्यक्ष भेट व्हावी, अशी इच्छा आहे आणि त्यांच्या समवेत काम करण्याचे माझे स्वप्नं आहे.’
- प्रणय पाटोळे
Web Title: Elon Musks Pune Friend Pranay Patole
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..