कार्यकर्त्याच्या आठवणीने अजितदादा झाले भावविवश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

जिल्हा बॅंकेचे माजी संचालक कै. अरुणआबा गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा व माजी सरपंच स्वप्नील गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची दादांनी आपुलकीने विचारपूस केली. आबांच्या आठवणीने दादांना गहिवरून आले.

तळेगाव ढमढेरे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या धामधुमीतही आपला सच्चा कार्यकर्ता व जिल्हा बॅंकेचे माजी संचालक कै. अरुणआबा गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

अजित पवार मंगळवारी शिरूर तालुक्‍यात निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी नगर रस्त्यावरील कोंढापुरी गावात जाण्याची इच्छा व्यक्त केली. येथील जिल्हा बॅंकेचे माजी संचालक कै. अरुणआबा गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा व माजी सरपंच स्वप्नील गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची दादांनी आपुलकीने विचारपूस केली. आबांच्या आठवणीने दादांना गहिवरून आले. ते काही काळ भावनावश झाले.

एका सच्चा कार्यकर्त्याला शिरूर तालुका मुकला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कमी वयात त्यांचा मुलगा स्वप्नील गावचा सरपंच झाल्याचा अभिमान दादांनी बोलून दाखविला. आबांना जाऊन तीन वर्षे झाली, तरी त्यांची आठवण राजकीय व सामाजिक जीवनात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

या वेळी गायकवाड कुटुंबातर्फे पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, युवक जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, डी. एल. नाना गायकवाड, अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नितीन गायकवाड, अनिल देशमुख, अजय गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: emotional ajit pawar remembers demised colleague