एम्पायर रॅम्प मार्चपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील संत मदर तेरेसा पुलाच्या दोन्ही बाजूला रॅम्प बांधण्याचे काम ६५ टक्के झाले असून, मार्चपर्यंत रॅम्पचे बांधकाम पूर्ण होईल. एम्पायर इस्टेट सोसायटीसमोर बांधण्यात येत असलेल्या या रॅम्पमुळे वाहनचालकांना काळेवाडी फाट्याकडे थेट ये-जा करता येईल. या पुलावरील वाहतूक वाढल्यानंतर चिंचवडमधील वाहतुकीच्या कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल.

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील संत मदर तेरेसा पुलाच्या दोन्ही बाजूला रॅम्प बांधण्याचे काम ६५ टक्के झाले असून, मार्चपर्यंत रॅम्पचे बांधकाम पूर्ण होईल. एम्पायर इस्टेट सोसायटीसमोर बांधण्यात येत असलेल्या या रॅम्पमुळे वाहनचालकांना काळेवाडी फाट्याकडे थेट ये-जा करता येईल. या पुलावरील वाहतूक वाढल्यानंतर चिंचवडमधील वाहतुकीच्या कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल.

काळेवाडी फाट्यापासून हा पूल पवना नदी लोहमार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरून ऑटो क्‍लस्टरपर्यंत जातो. हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी सहा महिन्यांपूर्वी खुला झाला. एम्पायर इस्टेट सोसायटीतील रहिवाशांचा रॅम्प उभारण्यास विरोध होता. मात्र, गेल्या वर्षी मार्चमध्ये रॅम्प बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. रॅम्प झाल्याशिवाय या पुलाचा उपयोग होणार नाही, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्या वेळी व्यक्त केले होते.

पुणे-मुंबई रस्त्यावरून वाहनचालकांना या रॅम्पवरून काळेवाडी फाटा तसेच चिंचवडच्या दिशेने जाता येईल. त्यामुळे चिंचवड लिंक रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. काळेवाडी फाट्याकडून येणारी वाहने दुसऱ्या रॅम्पवरून पुणे-मुंबई रस्त्यावर जाऊ शकतील. तेथून त्या वाहनांना निगडीच्या दिशेने जाता येईल. 

रॅम्पसाठीच्या सर्व खांबांचे बांधकाम झाले आहे. शंभर मीटर लांबीच्या भरीव पोच रस्त्यासाठी मुरूम टाकून तेथे सिमेंट काँक्रीटचे काम सुरू झाले आहे. साठ गर्डरपैकी ३६ गर्डर टाकण्यात आले आहेत. 

त्यावरील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठीची  प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. उर्वरित गर्डरचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करून तेथे रस्ता केल्यानंतर रॅम्पचे काम पूर्ण होईल.  

बीआरटीसाठी या पुलावरून स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. बीआरटीसाठी गाड्या उपलब्ध झाल्यानंतर तो मार्ग सुरू होईल. त्याचबरोबर पुलावरून पादचारी मार्ग करण्यात आला असून, रॅम्पपासून काही अंतरावर पुलावरून पादचाऱ्यांना जमिनीवर येण्यासाठी स्वतंत्र जिने बांधण्यात आले आहेत.

संत मदर तेरेसा पुलाच्या रॅम्पचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. रॅम्प झाल्यानंतर या पुलावरून जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर ये -जा करणे वाहनचालकांना सोईचे ठरणार आहे. या पुलावरून बीआरटी मार्गही प्रस्तावित आहे. त्याचेही काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले आहे.
- प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता, महापालिका

 

Web Title: Empire Estate Society Overbridge Ready in March