रोजगार मार्गदर्शन केंद्रामुळे ९० हजार तरुणांना नोकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपैकी निम्म्याहून अधिक तरुणांना सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे पावणेदोन लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजारांहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करून त्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन केले जाते. रिक्त पदांच्या मागणीनुसार पात्र आणि रोजगार इच्छुक उमेदवार उपलब्ध करणे, स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक माहिती, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, कौशल्य विकास कार्यक्रम, आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या तीन वर्षांत बेरोजगार तरुणांच्या नोंदणीमध्ये तुलनेत २०१८ मध्ये वाढ झाली. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षांत २३ रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये ७९३ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यांमध्ये ८५ हजार ६६८ बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार २०७ तरुणांची प्राथमिक निवड केली; तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानाअंतर्गत ३१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ
https://rojgar.mahaswayam.in

सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये रोजगाराच्या क्षमता वाढविण्यासाठी केंद्रातर्फे मार्गदर्शन करण्यात येते. त्यासोबतच बाजारपेठेतील मनुष्यबळाच्या मागणीनुसार विविध आस्थापना, उद्योजकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी साह्य करण्यात येते.  
- अनुपमा पवार, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

Web Title: Employment Guidance Centers give employment to 90 thousand youth