अतिक्रमण कारवाईचा कोथरूडमध्ये धडाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

कोथरूड - कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पदपथावरील अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कर्वे रस्ता, पौड रस्त्यासह गुजरात कॉलनी परिसरातील भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.

कोथरूड - कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पदपथावरील अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कर्वे रस्ता, पौड रस्त्यासह गुजरात कॉलनी परिसरातील भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.

पालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून रस्त्यालगतच्या रस्त्यावर आणि पदपथावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी रस्ता खुला होणार आहे. पालिकेकडून गेल्या पंधरा दिवसांमध्ये गुजरात कॉलनीतील माथवड भाजीमंडईसमोरील रस्ता, गणंजय डीपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्त्यालगतच्या पदपथावरील ६६ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये हातगाड्या, स्टॉल, काउंटर, बाकडी, सिलिंडर, लोखंडी खाट आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच एका झोपडीवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका हर्षाली माथवड म्हणाल्या, नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता मोकळा राहिलाच पाहिजे. तसेच पदपथ हा चालण्यासाठी असतो. व्यवसायासाठी नाही. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये कोणाचीही गय करू नये.

पालिकेच्या वतीने रस्त्यावर व पदपथावर बेकायदा अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. यंदाच्या वर्षांत या कारवाईचे स्वरूप आणखी तीव्र करण्यात येत आहे. यापुढील काळातही कोथरूड परिसरात कारवाई सुरूच राहणार आहे.
-  शिशिर बहुलीकर, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

गुजरात कॉलनी, कर्वे रस्ता, पौड रस्ता परिसरातील रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे चालण्यासाठी पदपथ राहिलेला नसून, चालायचे कोठून असा प्रश्‍न पडतो. वारंवार या परिसरात अतिक्रमण कारवाई केली पाहिजे. 
- सुनंदा काळे, नागरिक

Web Title: Encroachment Crime Kothrud