अतिक्रमणांवर पडणार हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

रस्त्यांवरील अपघात कमी व्हावेत आणि पादचारी, वाहनचालकांसाठी रस्ते सुरक्षित व्हावेत, यादृष्टीने महापालिका व पोलिसांच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर तत्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यास महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता व अपघात कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौथी बैठक झाली. तीत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे व विजेचे खांब काढणे, दुभाजक व सिग्नल दुरुस्ती, पादचाऱ्यांसाठी पदपथ चांगले करणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या.

महापालिका आयुक्त सौरभ राव व पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या उपस्थितीत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त विजय दहिभाते, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागांतील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये नगर रस्ता, सातारा रस्ता, महात्मा फुले मंडई, कोंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, लष्कर, हडपसर, कात्रज, स्वारगेट या रस्त्यांचा समावेश आहे. याबरोबरच संबंधित रस्त्याच्या मध्यभागी येणारे विजेचे खांब काढणे, दुभाजक दुरुस्ती, सिग्नल दुरुस्ती यांसारख्या विविध प्रकारच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.

Web Title: Encroachment Crime Municipal