आळंदी शहरात पालिकेने केली अतिक्रमणे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आज सुमारे पंधराहून अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. मात्र, प्रदक्षिणा रस्ता, चाकण रस्ता व मरकळ रस्त्यावर अनधिकृत शेंडबांधकाम अद्याप कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आज सुमारे पंधराहून अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. मात्र, प्रदक्षिणा रस्ता, चाकण रस्ता व मरकळ रस्त्यावर अनधिकृत शेंडबांधकाम अद्याप कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

आळंदी शहरात गेल्या अडीच वर्षांपासून अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रमुख रस्त्यांच्या कडेला पदपथावर व पालिकेच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकामे झाली. अनेकांनी हातगाड्या व पथारी मांडून टपऱ्या लावल्या. त्यामुळे शहरात बकालपणा वाढला. त्यातून वाहतूक कोंडीही होऊ लागली होती. याबाबत नेहमीच प्रशासनाकडे बोट दाखविले जात असे.

प्रशासनाबरोबर राजकीय मंडळीही अनधिकृत बांधकामास जबाबदार होती. मात्र, आठवड्यावर येऊन ठेपलेल्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. 

यामध्ये अनेक वर्षांपासूनचे पालिकेच्या समोरचे हॉटेल, मरकळ रस्त्यावरील पाण्याच्या टाकीखालील शेडबांधकाम, देहू फाट्यावरील शेडबांधकाम जमीनदोस्त केले. एसटी स्थानकाशेजारील टपऱ्या हटविल्या. अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त देण्यात आला होता. उद्या आणखी कारवाई केली जाणार आहे. 

दरम्यान, कार्तिकी वारीत पालिका तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने देते. यामध्ये काहींनी पावती करून जागा घेतल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachment crime by municipal in alandi