पदपथांवर अतिक्रमण 

पदपथांवर अतिक्रमण 

पदपथांची अवस्था ही पादचारी किती सुरक्षित आहेत, याचे कथन करते. शहरातील पदपथांवरून पादचाऱ्यांना हुसकावण्यात आले आहे आणि पदपथांवर वाहनांचे पार्किंग, दुकानदार आणि व्यावसायिकांच्या अतिक्रमणांचेच राज्य असल्याचे दिसून येते. 

कर्वे रस्ता

 सायकल ट्रॅक व पादचारी मार्ग अनेक ठिकाणी एकत्रच 
 काही भागांत पादचारी मार्ग अगदी उंचावर, चढ-उतार करणे सोईस्कर नाही
 दशभुजा गणपती चौक ते एसएनडीटी बसथांब्यापर्यंत पादचारी मार्गच नाही 
 पदपथावर बसथांबे, डीपी बॉक्‍स आणि व्यावसायिकांचे जागोजागी अतिक्रमण 

निरीक्षण 
कर्वे पुतळा चौकातून एसएनडीटीकडे चालत जाताना साधारणत: २०० ते ३०० मीटर अंतर चालल्यावर त्यातील खालच्या बाजूला असणारा मार्ग हा सायकल ट्रॅक असल्याचा फलक निदर्शनास आला; परंतु रस्त्याने चालत जाताना सलगता नसल्याने हा फरक कळून येत नव्हता. त्याशिवाय या दोन्ही मार्गांच्या मधोमध जागोजागी ‘पीएमपी’चे बसथांबे असल्यामुळे पायी चालताना या थांब्यांना वळसा घालून जावे लागत होते. काही ठिकाणी तर महापालिकेने मध्यम मार्ग काढत बसथांब्याच्या मागील बाजूला उंचावर पादचारी मार्ग केल्याचे दिसून आले. 

पायऱ्या चढणे अवघड 
‘‘तरुणांना ठीक आहे; पण आमच्यासारख्या वयस्कर नागरिकांना येथून जाताना चार ते पाच पायऱ्या चढून जाणे सोईस्कर होत नसल्याने हा थांबा आला की वाहतुकीच्या रस्त्यावरून वळसा घालून पुन्हा पादचारी मार्गावर आम्ही येतो,’’ असे देशपांडे आजोबा चालता-चालता सांगत होते. 

बंडगार्डन 
जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे स्थानक, जिल्हा परिषद, कॅम्पकडे जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जातो. अंतर्गत भागात नोटरी, झेरॉक्‍स आदी दुकाने थाटली गेली आहेत. अंतर्गत विस्तार आणि लांबी-रुंदी अधिक असलेल्या या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी घुसते. येथे चोरीच्या घटनाही वारंवार घडतात. त्यामुळे हा परिसर नागरिकांसाठी रात्रीच्यावेळी धोकादायक बनला आहे. 

 प्रवेशद्वारे तुटल्याने २४ तास वापर  
 सुरक्षारक्षक आणि विजेच्या उपलब्धतेचा अभाव
 बिअरच्या बाटल्या, उघड्यावर लघुशंका, अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

शिवाजी रस्ता
निरीक्षण ः पदपथ म्हणजे पादचारी सोडून अन्य सर्व कामांसाठी वापरात येणारी जागा, असे चित्र शिवाजी रस्त्यावर फेरफटका मारल्यानंतर दिसले. रामेश्‍वर चौकाच्या परिसरात पदपथ म्हणजे अतिरिक्त कामासाठी मोफत उपलब्ध करून दिलेली जागा, असा गोड गैरसमज दुकानदारांचा झाला असल्याचे दिसून आले. पथारीवाले, दुकानदार यांच्याबरोबरच महापालिका, महावितरण आणि पीएमपी यांनीदेखील अतिक्रमण केल्यामुळे पदपथांऐवजी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागणार नाही, यांची काळजी घेत नागरिकांना चालावे लागत आहे. 

 बेलबाग चौकापासून गाडीखान्यापर्यंत पदपथच नाही 
 नाना वाड्यापासून मंडईपर्यंत पदपथावरच पीएमपीचे बसथांबे 
 महावितरणचे लाल डबे (डीपी) पदपथावरच 
 जमिनीला समांतर किंवा एक ते दीड फूट उंच असे पदपथाचे विविध प्रकार दिसले 
 काही ठिकाणी पदपथांचा वापर पार्किंगसाठी 
 स्वारगेटपर्यंत पदपथ आहे; पण सलग चालणे शक्‍य नाही

सिंहगड रस्ता
‘‘गेल्या आठवड्यातील घटना... रस्ता दुभाजकावरून एक महाभाग उडी मारून रस्ता ओलांडण्याच्या तयारी असतानाच वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाची धडक त्याला बसली आणि तो माझ्या अंगावर पडून जोरजोरात ओरडू लागला; पण मला त्याचे काही नवल वाटले नाही...कारण एक दिवसाआड अशा घटना मी पाहतो... आता मलादेखील सवय झाली आहे. ’’ दांडेकर पुलापासून हा रस्ता सुरू होतो. या रस्त्याची पाहणी करताना संवेदना बोथट झालेल्या प्रशासन आणि बेदखल पादचारी यांची जाणीव जणू या रस्त्याने बोलून दाखविली.

 रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा नाही 
 दांडेकर पुलापासून ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पदपथच नाहीत.
 काही ठिकाणी पदपथावर अतिक्रमण आणि राडारोडा पडलेला आहे. 

सोलापूर रस्ता 
निरीक्षण ः रामटेकडी येथे पदपथ आणि सायकल ट्रॅक दोन्ही दिसतात. पुढे पदपथांवर वाहनविक्रेत्यांचे पार्किंग अतिक्रमण झाले आहे. सोलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी पदपथांचे अस्तित्वच दिसून येत नाही. काही भागांत पदपथांवर शेजारी असलेल्या दुकानदारांनी अतिक्रमण करून त्या जागेचा वापर सुरू केला आहे. सायकल ट्रॅकपेक्षा पदपथाची रुंदी कमी असल्याचे दिसून आले.

फातिमानगर चौकात हडपसरकडे जाताना पदपथच नाही. 
 गाडीतळ चौकात सासवडकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या वळणावर पदपथच नाहीत. 
 पुलगेट येथे पादचाऱ्यांचा सिग्नल बंद

डेक्कन 
जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्त्याकडे जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जातो. मध्यभागी खुले असल्यामुळे प्रकाशव्यवस्था चांगली आहे. स्वच्छता तसेच झाडे, फुले आणि कोरीव बाग, मध्यभागी नागरिकांना बसण्याची व्यवस्था असल्यामुळे हा मार्ग नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीचा आहे. 

 तरुणाईसाठी ‘सेल्फी’ पॉइंट
 डेक्कन जिमखान्याच्या बाजूने प्रवेशद्वारावर भाजीपाला, फळविक्रेत्यांचे अतिक्रमण
 नागरिकांना डेक्कन जिमखान्या-कडून जंगली महाराज रस्त्याकडे जाताना अडथळा

या भुयारी मार्गाचा चांगला वापर होतो. नागरिकांच्या रहदारीच्या दृष्टीने तो उपयुक्त आहे. मात्र, त्याची व्यवस्थापनाच्या बाबतीत दुरवस्था आहे. रात्री एखाद्या नागरिकाचा खूनही होऊ शकतो. चारही बाजूंची प्रवेशद्वारे तुटली असल्याने गुन्हेगार, मद्यपींकडून त्याचा गैरकामासाठी उपयोग होत आहे. त्यामुळे प्रवेशद्वार बसविण्याची आणि सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे; तसेच विजेची व्यवस्था करण्याची गरज आहे. 
- अतुल भालेराव, नागरिक.

भुयारी मार्ग चोवीस तास खुला असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दुगड चौकातील वाहनांची वर्दळ जास्त असल्याने स्थानिक नागरिक भुयारी मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. याचबरोबर, या मार्गात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. 
- शांताराम फडके, स्थानिक नागरिक 

भुयारातील बगीचाची एक बाजू सुंदर आहे. मात्र, त्याची दुसऱ्या बाजूची देखभाल केली पाहिजे. अंतर्गत भागात फरशा फुटल्या असून, त्या बसविल्या पाहिजेत. 
- शुभम वसेकर, पादचारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com