काळेपडळ-तुकाईटेकडी परिसरातही पथारी व्यवसायिकांचे अतिक्रमण

कृष्णकांत कोबल
बुधवार, 4 जुलै 2018

मांजरी (पुणे) : हडपसर पाठोपाठ आता काळेपडळ-तुकाईटेकडी परिसरातही अनधिकृत पथारी व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली गेली आहेत. त्यामुळे येथील नवीन पदपथ व रस्ते व्यापले जाऊन पादचारी व वाहनचालकांच्या प्रवासाला अडथळे येऊ लागले आहेत. दिवसेंदिवस येथील व्यवसायिकांची मुजोरगिरी वाढत चालली असून सर्वसामान्यांबरोबरच प्रतिष्ठीत नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  

मांजरी (पुणे) : हडपसर पाठोपाठ आता काळेपडळ-तुकाईटेकडी परिसरातही अनधिकृत पथारी व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली गेली आहेत. त्यामुळे येथील नवीन पदपथ व रस्ते व्यापले जाऊन पादचारी व वाहनचालकांच्या प्रवासाला अडथळे येऊ लागले आहेत. दिवसेंदिवस येथील व्यवसायिकांची मुजोरगिरी वाढत चालली असून सर्वसामान्यांबरोबरच प्रतिष्ठीत नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  

स्मार्ट व सुंदर सिटीची घोषणा करीत महापालिकेने हडपसर मधील विविध भागात कोटय़वधी रुपये खर्च करून नवीन रस्ते आणि पदपथ बांधण्यात आलेले आहेत. त्यावरून वाहने आणि पादचाऱ्यांचा प्रवास होण्याएेवजी अनधिकृत फेरीवाले व भाजीवाल्यांनी अतिक्रमण करून ताबा घेतला आहे. काळेपडळ तुकाईटेकडी भागात असे हजारो व्यवसायिक राजरोसपणे व्यवसाय करीत असून सामान्य नागरिक, वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच या भागातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही या मुजोर व्यावसायिकांच्या दादागिरीचा सामना करावा लागत आहे. ""आम्ही पालिका अधिकाऱ्यांना हप्ते देतो, त्यामुळे आम्हाला कोणीच हटवू शकत नाही'', अशी भाषा थेट लोकप्रतिनिधींनाही त्यांच्याकडून केली जात आहे. 

हडपसर, गाडीतळ, ससाणेनगर, हांडेवाडी रोड याभागात रस्ते आणि पदपथावर फळे व भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण असतांनाच काळेपडळ तुकाईटेकडी भागात आज मोठय़ा प्रमाणात मिळेल त्या जागी अतिक्रमण करून जागा ताब्यात घेऊन व्यवसाय सुरू केला जात आहे. महापालिकेने अनेक वेळा कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्यांच्याकडून बस्तान मांडले जात आहे. रस्ते आणि पदपथावरून चालण्याचा पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा असतो, असे धडे वाहतूक पोलीस विभागाकडून दिले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याचा अनुभव येथे येत आहे. 

तुकाईटेकडी समोरून काळेपडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळच्यावेळी या व्यवसायिकांमुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. येथील वाढलेल्या अतिक्रमानाबाबत पालिका अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक महिलांनीही त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. 

"तुकाईटेकडी, काळेपडळ येथे वाढत असलेले पथारी व्यवसायिकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. नागरिकांनी त्याबाबत आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडून कारवाईत टाळाटाळ केली जात आहे. आयुक्तांना त्याबाबत माहिती देऊन कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.'' 
- उज्वला जंगले, नगरसेवक

Web Title: encroachment increased in kalepadal tukai tekadi