अतिक्रमणांचे ‘मार्केट’!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

बाजार समिती आवारातील स्थिती; सर्वांना सोबत घेण्याची गरज
पुणे - मोकळ्या जागांचा होत नसलेला वापर, वाढलेली अतिक्रमणे, वाहतूक नियोजनाचा आणि मालाच्या आवकेनुसार व्यवस्थेतील बदलाचा अभाव आदी कारणांमुळे मार्केट यार्ड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटू शकत नाही. कोंडी सोडविण्यासाठी बाजारातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन निर्णय घेणे, पायाभूत सुविधा पुरविणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने करणे, असे उपाय करणे आवश्‍यक आहे.

बाजार समिती आवारातील स्थिती; सर्वांना सोबत घेण्याची गरज
पुणे - मोकळ्या जागांचा होत नसलेला वापर, वाढलेली अतिक्रमणे, वाहतूक नियोजनाचा आणि मालाच्या आवकेनुसार व्यवस्थेतील बदलाचा अभाव आदी कारणांमुळे मार्केट यार्ड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटू शकत नाही. कोंडी सोडविण्यासाठी बाजारातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन निर्णय घेणे, पायाभूत सुविधा पुरविणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने करणे, असे उपाय करणे आवश्‍यक आहे.

मार्केट यार्ड येथील बाजाराचे फळे-भाजीपाला-कांदा-बटाटा आवार आणि किराणा भुसार मालाचे आवार असे दोन भाग पडतात. या दोन्ही बाजारांत अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील शिवनेरी रस्त्यावर हातगाडीवाल्यांमुळे वाहतुकीसाठी पुरेशी जागाच उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे किराणा भुसार मालाच्या बाजारात अनेक टपरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांची दुकाने वळणावरच थाटलेली आहेत. महापालिका शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करते. वाहतूक पोलिसांकडूनही त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. शिवनेरी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास इतर वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. या ठिकाणी काही वेळा बाजार समितीचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस दिसतात, परंतु त्यांनी नियमित वाहतूक नियंत्रण केल्यास आणि अतिक्रमणे हटविल्यास निश्‍चितच फरक दिसेल. येथील वळणावरील टपऱ्या स्थलांतरित करणे आवश्‍यक आहे. 

मोकळ्या जागांचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, प्रत्येक माल वाहतूकदाराला क्रमानुसार बाजारात सोडावे, त्याकरिता ‘टोकन’ पद्धत सुरू करावी. वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच होतो. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी टेंपो पंचायतीने वेळोवेळी बाजार समितीकडे निवेदने दिली आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
- संतोष नांगरे,  अध्यक्ष - टेंपो पंचायत

फळे भाजीपाला बाजारातील वाहतुकीचे नियोजन नसल्याचा त्रास किराणा भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना होतो. वाहतूक नियोजनाकडे समितीचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे, बाजारातील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत.
- प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी समितीचे दोन कर्मचारी आणि दहा खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर वाहतूक नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरांच्या बाजारातील मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून तेथे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवनेरी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तेथे ग्रेड सेपरेटर उभारण्याची सूचना महापालिकेला केली आहे.
- दिलीप खैरे, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती  

वाहतूक नियोजन विभागच नाही
बाजारात दररोज आठ ते दहा हजार वाहने मालवाहतुकीसाठी येतात. या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मितीच केलेली नाही. यापूर्वी असा एक अधिकारी नियुक्त करावा, अशी चर्चा बाजार समितीच्या प्रशासनाने केली होती; परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.

समितीचे कर्मचारी आवारात येणाऱ्या वाहन चालकांकडून ‘अतिरिक्त शुल्क’ वसूल करतात. हे शुल्क दिल्यावर त्यांना बाजारात प्रवेश दिला जातो. अशा कर्मचाऱ्यांवर समिती कोणतीही कार्यवाही करीत नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात आली; परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणाच नाही. फळे-भाजीपाला बाजारात गाळ्यांपुढे माल ठेवण्याची मर्यादा घालून दिली, पण त्याचीही अंमलबजावणी होत नाही. माल उतरविणे आणि भरण्याच्या वेळा निश्‍चित केल्यास त्याचाही उपयोग होऊ शकतो. 
 

मोकळ्या जागांचा वापर कधी? 
बाजार समितीच्या आवारातील दोन ठिकाणी पार्किंगची जागा सध्या अपुरी पडत आहे. किराणा भुसार मालाच्या बाजारात प्रवेशद्वार क्रमांक २ आणि ३ यांच्यामागे सुमारे एक एकर मोकळी जागा आहे. त्याचप्रमाणे गुरांच्या बाजारात सुमारे तीन एकरांहून अधिक जागा रिकामी असते. त्याचप्रमाणे किराणा भुसार मालाच्या दुकानांच्या रांगांमध्ये रिकाम्या असलेल्या सर्व्हिस लेनच्या जागेत राडारोडा पडलेला आहे. या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी आणि नैसर्गिक विधीसाठी होत आहे. या जागांचे सपाटीकरण केले आणि नियोजन केल्यास त्या पार्किंगसाठी उपयोगात आणता येऊ शकतात. सर्व्हिस लेनच्या जागेवर मालाची ने-आण करणारे टेम्पो, जीप आदी वाहनांसह खासगी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होऊ शकते. दुकानांसमोर वाहने उभी करण्यास मनाई करता येऊ शकते. रस्ता मोकळा झाल्यास अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. 

Web Title: encroachment market yard