पिंपरी बाजारपेठेत पदपथ आक्रसले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पिंपरी - पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक ते साई चौक या मार्गावर ८० टक्‍के दुकानदारांनी पदपथ गिळंकृत केले असून रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो.

शगुन चौक ते साई चौक या परिसरात दुकानदारांनी दुकानातील सामान येथील थेट पदपथावर आणून ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर काहींनी पदपथ गिळंकृत करून रस्त्यावरही सामान ठेवले आहे. याशिवाय दुकानातील सामानाची माहिती देणारे फलक, दुचाकी वाहने, गाद्या, फर्निचर, शिलाई मशिन, चप्पलविक्री स्टॅण्ड, वॉटर फिल्टर आदी साहित्य पदपथावर ठेवले आहे.

पदपथालगत दुकानासमोर अनेकांनी लोखंडी जाळ्या ठेवल्या आहेत. तसेच या जाळ्यांच्या बाजूला स्वतःची वाहने लावतात. खरेदीकरिता आलेले ग्राहक चारचाकी वाहने यापुढे लावतात. ही परिस्थिती रस्त्याच्या दुतर्फा असते. यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखीनच अरुंद होतो. एरवी या मार्गावरून चार वाहने ये-जा करू शकतात. मात्र अतिक्रमणामुळे मोठ्या मुश्‍किलीने दोनच वाहने जाऊ शकतात. मंडईजवळ पार्किंग असूनही त्याचा वापर वाहनचालकांकडून केला जात नाही. 

पिंपरी मंडईतून पिंपरीगावात घरी जाताना वाहतूक कोंडीमुळे त्रास तर होतोच, परंतु पदपथावरील अतिक्रमणामुळे खरेदीला गेल्यावरही लहान मुलांना हाताला धरून वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावरून चालावे लागते. महापालिकेने याबाबत उपाययोजना करायला हवी.
- रश्‍मी राकेश मोरे, गृहिणी

संपूर्ण शहरात पदपथावर फेरीवाले आणि व्यापारी यांनी अतिक्रमण केले आहे. पदपथ नागरिकांना चालण्यासाठी आहेत की व्यापाऱ्यांसाठी हे महापालिकेने स्पष्ट करावे. या अतिक्रमणाला महापालिकेचे अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत.
- वैशाली धुमाळ-देशमुख, व्यावसायिका

अतिक्रमणविरोधी कारवाई करायची असल्यास त्यास पुरेशा पोलिस बंदोबस्ताची आवश्‍यकता असते. यापूर्वी कारवाई करताना व्यापाऱ्यांशी वादही झालेले आहेत. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर त्या भागात कारवाई केली आहे. सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रभाग स्तरावरूनच मजूर उपलब्ध करून दिले जातात. यामुळे मनुष्यबळाची नेहमीच कमतरता असते. 
- रवींद्र जाधव, प्रशासन अधिकारी-ब प्रभाग

Web Title: encroachment in pimpri camp