अतिक्रमणांमुळे श्‍वास कोंडला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड; मंडई, विश्रामबागवाडा, तुळशीबाग परिसरातील स्थिती

पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड; मंडई, विश्रामबागवाडा, तुळशीबाग परिसरातील स्थिती
पुणे - शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई, विश्रामबागवाडा, तुळशीबाग, दत्त मंदिर परिसर आणि अप्पा बळवंत चौक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांचा श्‍वास कोंडल्याचे रविवारी दिसून आले. याच प्रभागातील नगरसेविका मुक्ता टिळक महापौर झाल्या आहेत, हे विशेष! अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचा "फिक्‍स पॉईंट' सोमवार ते शुक्रवारी कार्यालयीन वेळेतच उपलब्ध असल्यामुळे तो शोभेचा ठरला आहे.

शनिपार चौक ते रामेश्‍वर चौक, महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळा ते कामगार पुतळा, अप्पा बळवंत चौक ते शनिपार चौकादरम्यान दर शनिवारी-रविवारी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. मात्र या भागातील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालता येत नाही अन्‌ वाहनांनाही कोंडीतून रस्ता शोधावा लागतो. या अतिक्रमणांना माननीयांचा "राजाश्रय' असल्याची चर्चा असून अर्थपूर्ण हितसंबंधांमुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पोलिस यांच्याकडूनही त्याकडे कानाडोळा होतो आणि त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात.

विश्रामबागवाड्यासमोर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र लेन केली आहे. परंतु, त्यात दुचाकी उभ्या केल्या जातात आणि तेथेच पथारी व्यावसायिक सायंकाळी पाचनंतर दुकाने थाटतात. त्यामुळे पादचाऱ्यांना लेनमधून चालणे अवघड होत असल्यामुळे नागरिक रस्त्याचा वापर करतात आणि वाहतुक कोंडीत आणखी भर पडते. रामेश्‍वर चौक ते शनिपार दरम्यानचा रस्ता दुतर्फा अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी रस्ता व्यापलेला दिसतो. तुळशीबागेच्या तोंडाशी उभ्या राहणाऱ्या रिक्षा, मोटारींवर वाहतूक पोलिसांकडून क्वचित कारवाई होते. याच रस्त्यावर फळविक्रेत्यांच्या हातगाड्याही रस्त्याचा भाग व्यापतात.

टिळक पुतळा ते दत्त मंदिर दरम्यानही रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत विक्रेते बसलेले दिसतात. या रस्त्यावर मध्यभागात महापालिकेने पूर्वी लोखंडी बॅरिकेड्‌स उभारले होते. परंतु, पथारी व्यावसायिकांनी ते काढून टाकले आहेत. दत्तमंदिरासमोरही मोकळ्या जागेत अनधिकृत वाहनतळ निर्माण झाला असून त्याच्या भोवतीही पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अप्पा बळवंत चौकात फरासखाना इमारतीसमोरही अनधिकृत पथारी व्यावसायिकांमुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. परंतु, अनधिकृत विक्रेत्यांना हटवणे आमचे काम नाही, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे अन्‌ अतिक्रण विभाग कारवाई करीत नाही. त्यामुळे परिसरातील रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेले आहेत.

हितसंबंध सांभाळणारी टोळी!
मध्यभागात रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांना संरक्षण देणारी एक टोळीही कार्यरत आहे. या विक्रेत्यांकडून वसुली करून संबंधितांपर्यंत पोचविण्यासाठी ही टोळी सक्रिय आहे. तसेच या विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यासाठी जागाही ते निश्‍चित करून देतात. त्यासाठी 100 ते 300 रुपयांपर्यंत दररोज पैसे ते घेतात. ही टोळी अतिक्रमण विभागातील कर्मचारी, काही पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

कर नाही अन्‌ कोणतेही शुल्क!
मध्यभागातील मोक्‍याच्या रस्त्यांवर बसणारे अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेकडून कारवाई होत नाही. त्यामुळे कोणतेही शुल्क न देता ते रस्त्यावर पथाऱ्या थाटतात. महापालिकेचे पथ दिवे असल्यामुळे त्यांना विजेची गरज भासत नाही. पथाऱ्यांच्या शेजारील जागेवर नागरिकांना वाहनेही लावू दिली जात नाहीत. त्यामुळे कोणतेही पथारी व्यावसायिकांनीच या रस्त्याच कब्जा घेतल्याचे दिसते. अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या उपद्रवामुळे परिसरातील दुकानदार मेटाकुटीला आले आहेत.

Web Title: encroachment in pune