महापौरांच्या सूचनेला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मध्यभागातील अतिक्रमणांची संख्या वाढली - कारवाईला मुहूर्त केव्हा?

पुणे - शहराच्या मध्यभागातील अतिक्रमणांवर कारवाई करा, अशा सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मध्यभागातील कोंडी वाढतच असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

मध्यभागातील अतिक्रमणांची संख्या वाढली - कारवाईला मुहूर्त केव्हा?

पुणे - शहराच्या मध्यभागातील अतिक्रमणांवर कारवाई करा, अशा सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मध्यभागातील कोंडी वाढतच असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

शहराच्या मध्यभागात महात्मा फुले मंडई, शनिपार चौक, रामेश्‍वर चौक, टिळक पुतळा ते बेलबाग चौक, तसेच बुधवार मजूर अड्डा, अप्पा बळवंत चौक आदी परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर तर पादचाऱ्यांना चालणेही अवघड होते. या भागातील पदपथांवरच अतिक्रमणे थाटणाऱ्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या अनधिकृत हातगाड्यांची संख्या मोठी असून, या गाड्या वाहने पार्क करण्याच्या जागेत उभ्या राहत आहेत. विश्रामबाग वाड्यासमोर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र लेन केली आहे; परंतु त्यातही अनधिकृत विक्रेतेच बसत आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा फिक्‍स पॉइंट आहे; परंतु त्यातील कर्मचारी या अतिक्रमणांकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले.

उन्हाळी सुट्या लागल्याने बाहेरगावाहून शहराच्या मध्यभागात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातील अनेक जण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात; परंतु त्याच परिसरात अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

स्वतंत्र पोलिस मिळूनही दुर्लक्षच!
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी वाढत्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त केली होती. तेव्हा अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी महापालिकेला अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे मिळालेले आहेत. त्यात पुरेसे अधिकारी व कर्मचारी आहेत, असे सांगितले होते. तरीही कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

Web Title: encroachment in pune