#PuneTraffic विळखा अतिक्रमणांचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - शहराचा विस्तार होत असतानाच मध्यभागातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासन, वाहतूक पोलिस कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्यांवर आणि पदपथांवर वाढणाऱ्या अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 

पुणे - शहराचा विस्तार होत असतानाच मध्यभागातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासन, वाहतूक पोलिस कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्यांवर आणि पदपथांवर वाढणाऱ्या अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 

शहराच्या मध्यभागातून लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, महाराणा प्रताप रस्ता, गणेश रस्ता, नेहरू रस्ता हे प्रमुख रस्ते असून, या रस्त्यांना जोडणारे अनेक छोटे रस्ते आहेत. यापैकी एकही रस्ता अतिक्रमणमुक्त नाही. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध होत नाहीत. महापालिकेने लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील पदपथांची रुंदी वाढविली आहे. इतर रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत. त्याचा परिणाम सुरळीत वाहतुकीवर होईल का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. मध्यवस्तीतील रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि जुन्या बांधकामाच्या ठिकाणी पुनर्विकास झाल्यानंतर तेथे पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. 

जुन्या वाड्यांच्या ठिकाणी नवीन इमारती उभ्या राहत असल्या, तरी तेथे पार्किंगसाठी जी जागा राखीव ठेवली जाते, त्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याने तेथील नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. तुळशीबाग, बाबू गेणू चौक, मंडई, बोहरी आळी, कापड गंज, अप्पा बळवंत चौक, तापकीर गल्ली या भागात वाहनाने येणाऱ्या ग्राहकाला वाहन उभे करण्यासाठी जागा शोधत फिरावे लागते. जागा मिळाल्यानंतरच त्याचा जीव भांड्यात पडतो. पदपथ आणि रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इतर विक्रेते पथारी लावून वस्तूंची विक्री करीत आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याचा दावाही व्यापारी करीत आहेत.

अतिक्रमणामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. सध्या मंदीचे वातावरण आहे. पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे मध्यभागातील बाजारातील ग्राहक दुसरीकडे वळत आहे. दुचाकीच चालवता येत नाही, तर मग चार चाकी घेऊन येण्याचा विचार तर खूपच लांब आहे. वाहतूक नियमन व्यवस्थित केले पाहिजे.
- मिठालाल जैन, पूना इलेक्‍ट्रॉनिक्‍स हायर पर्चेस असोसिएशन

Web Title: encroachment in pune city central area