तापकीर चौकाला विळखा

रवींद्र जगधने
मंगळवार, 8 मे 2018

पिंपरी - काळेवाडी येथील तापकीर चौकात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळविक्रेते, दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचा रहदारीस अडथळा होत असून, चौकातील कोंडी नित्याचीच झाली आहे. हप्ते वसुली, त्यातून मिळालेले अभय यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे. 

पिंपरी - काळेवाडी येथील तापकीर चौकात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळविक्रेते, दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचा रहदारीस अडथळा होत असून, चौकातील कोंडी नित्याचीच झाली आहे. हप्ते वसुली, त्यातून मिळालेले अभय यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे. 

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटी मार्गावरील हा महत्त्वाचा चौक आहे. हिंजवडी, वाकड, थेरगाव, रहाटणी, पिंपरीगाव, पिंपरी कॉलनी आदी भागाकडे जाणारी वाहने याच चौकातून जातात. त्यामुळे दिवसा व रात्री उशिरापर्यंत मोठी वर्दळ असते. मात्र, या चौकाला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. पादचारी व सायकल ट्रॅकवर दुकानदारांनी वाढीव बांधकामे केली आहेत. तर, खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आदी विक्रेत्यांनीही रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या हातगाड्या, तसेच दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक वाहने रस्त्यावर लावत असल्याने रहदारीस अडथळा येत आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. थेरगावकडील पदपथावर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. तापकीर चौकालगत मंदिराच्या बाजूला एका स्थानिकाने पदपथावर बांधकाम केले आहे. त्याव्यतिरिक्त अनेक टपऱ्या व दुकानदारांनी वाढीव बांधकामे केली आहेत. याबाबत तक्रारी करून प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. बीआरटी मार्गात अनधिकृत होर्डिंग कायम आहेत. 

गावगुंडांची हप्ते वसुली
हातगाड्या व फेरीवाल्यांकडून काही राजकीय कार्यकर्ते हप्ते वसुली करत आहेत. हप्ते न दिल्यास फेरीवाल्यांना मारहाण व तोडफोडीच्या घटना याआधी घडलेल्या आहेत.

प्रभागातील अतिक्रमणांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून, प्रशासनाने तापकीर चौकासह इतरही ठिकाणची अतिक्रमणे काढण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच कारवाई होण्याची अपेक्षा आहे. 
- सविता खुळे, नगरसेविका

चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटायला पाहिजे. तसेच चौकात पार्किंगची सुविधा करणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने योग्य उपाययोजना करायला हव्यात.
- मुरलीधर ढगे, स्थानिक रहिवासी

तात्पुरत्या स्वरूपाची अतिक्रमणे व हातगाड्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत काढल्या जातात. मात्र, कायमस्वरूपाची अतिक्रमणे काढण्याचे काम महापालिका मुख्य कार्यालयामार्फत चालते.
- स्मिता झगडे, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी, महापालिका

Web Title: encroachment in tapkir chowk PCMC