अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ

अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ

पुणे - औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम वगळता अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांकडे यावर्षीही विद्याaर्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी अभियांत्रिकी पदवीच्या ६१ हजार ६१४, तर पदविका अभ्यासक्रमाच्या ७१ हजार ९५४ जागा रिक्त राहिल्या आहेत. वास्तुकला अभ्यासक्रमालाही यंदा कमी प्रवेश झाले आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये तंत्र शिक्षणासाठी प्रवेशाचा कल गेल्या वर्षीपेक्षाही यंदा खालावला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची बेसुमार वाढलेली संख्या आणि बाजारपेठेला आवश्‍यक मनुष्यबळ निर्मितीत कमी पडणारी महाविद्यालये यामुळे दरवर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांमध्ये रोजगारक्षमता रुजविली जात नाही. परिणामी, उद्योगांमध्ये रोजगार मिळण्याचे प्रमाणही कमी असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

शहरी भाग वगळता ग्रामीण भागांतील महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात आवश्‍यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव, तसेच पात्र शिक्षक, प्राचार्यांची कमतरता यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या मंदीची चर्चा जोरात असल्याने औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळण्याची शाश्‍वती आहे का, याबद्दलची चिंताही विद्यार्थी संख्या कमी होण्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. 

दुसरीकडे, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमांसाठी चांगले प्रवेश होतात, अशीही स्थिती आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ज्या संस्थांमध्ये चांगले तंत्रज्ञान, शिक्षक आहे तिथे विद्यार्थी जातात. खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश शुल्क जास्त असते, त्याच तुलनेत तिथे यंत्रसामग्री आणि सुविधा दिल्या जातात. त्यामुळे या विद्यापीठांकडे विद्यार्थी जातात, हे देशभरातील चित्र आहे. 

तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे, यास वास्तुकला अभ्यासक्रमही अपवाद नाही. याशिवाय, यंदा प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत ५० टक्के गुण हवेत हा नियम लागू झाला. तसेच, पूर्वी ‘नाटा’ प्रवेश मागणीनुसार देता येत होता. तो आता वर्षातून दोनदाच होतो. हीदेखील ‘वास्तुकला’चे प्रवेश कमी होण्याची कारणे आहेत.
- पुष्कर कानविंदे, सदस्य, वास्तुकला परिषद  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com