'इंजिनिअरिंग मॅकेनिक्‍स'चा पेपर फुटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "इंजिनिअरिंग मॅकेनिक्‍स' हा पेपर आज फुटला. नंतर विद्यापीठाने त्याची चौकशीही केली. मात्र, "पेपर फुटला नाही, तर कुणीतरी खोडसाळपणा करून परीक्षेनंतर पेपरचे फोटो व्हायरल केले आहेत,' असा खुलासा केला आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "इंजिनिअरिंग मॅकेनिक्‍स' हा पेपर आज फुटला. नंतर विद्यापीठाने त्याची चौकशीही केली. मात्र, "पेपर फुटला नाही, तर कुणीतरी खोडसाळपणा करून परीक्षेनंतर पेपरचे फोटो व्हायरल केले आहेत,' असा खुलासा केला आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा या वेळेत होता. विद्यापीठाकडून तो कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयास सकाळी 9.40 ला पाठविला. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास तो व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाला. याबाबत विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, 'कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. माझ्यापर्यंत हा पेपर साडेअकरानंतर आला आहे. कदाचित एखाद्या मुलाने परीक्षा केंद्रातून लवकर बाहेर पडून तो व्हायरल केला असावा, अशी शक्‍यता आहे. याशिवाय अन्य दोन पेपर माझ्याकडे आले. ते 2014 आणि 2016 मध्ये झालेल्या परीक्षेचे होते.''

विद्यापीठाची सारवासारव
पेपर फुटला असतानाही विद्यापीठाकडून त्याची सारवासारव सुरू झाली आहे. या प्रकाराबद्दल सायंकाळी माध्यमांना मेल पाठविण्यात आले. "विद्यापीठाच्या पथकाने केलेल्या चौकशीत हा पेपर फुटलेला नाही. परीक्षा दहा वाजता सुरू झाल्यानंतर कोणीतरी खोडसाळपणा केला आणि मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर (परीक्षा केंद्राबाहेर) पाठवून दिले. त्यानंतर हे पेपर व्हायरल झाले. हा खोडसाळपणा कुणी केला हे शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल.

महाविद्यालयांकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल,' असे म्हटले आहे.

चौकशीबाबत साशंकता
विद्यापीठाने पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी "एमआयटी'मध्ये पाठविलेल्या पथकामध्ये एकही व्यक्ती विद्यापीठातील मूळ नियुक्तीवरील वा अधिकारी पदावरील नव्हती. विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रतिनियुक्तीवर विशेष अधिकारीपदी असणाऱ्या दोघांना आणि आयटी सेलमधील दोघांना चौकशीसाठी पाठविण्यात आले होते, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या चौकशीच्या सत्यतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: engineering mechanics paper leakage