कळ्यांना कोमेजू न देणारे बहुरंगी बापू 

नीलेश शेंडे
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

शिक्षक, व्याख्याता, लेखक आणि व्यंग्यचित्रकार अशा अनेक भूमिका एका व्यक्तीने ताकदीने केल्या. त्यांनी ज्ञान दानाच्या पवित्र कार्यातून हजारो हिरे घडविले. त्यांच्या रेषांच्या जादूने कधी चेहऱ्यावर हसू; तर कधी डोळ्यात आसू आणले. त्यांच्या विनोदी कथांनी पोट धरून हसवले; पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी ते स्वतःच कोमेजले. त्यामुळे त्यांनी उमलत्या कळ्यांना कोमेजू न देण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी त्यांनी गावोगावी व्याख्याने दिली. ते म्हणजे बापू घावरे. वामन मूर्ती; पण कार्य त्यांचे डोंगराएवढे. मुळशीचे ते एक दुर्मिळ रत्न होते. त्यांनी आयुष्यभर लोकांच्या ओठावर हास्य फुलवले, पण सोमवारी (ता. 7) अचानक "एक्‍झिट' घेऊन डोळ्यात पाणी आणले...

बापू म्हणून परिचित असलेले प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम लक्ष्मण ऊर्फ बापू घावरे यांचे सोमवारी अकाली निधन झाले. ते मूळचे मुळशी तालुक्‍यातील बेलावडे गावचे. त्यांचे आजोबा- पणजोबा, वडील वारकरी संप्रदायातले. बेलावडे येथे आजोबा- पणजोबांच्या संजीवन समाध्या आहेत. तालुक्‍यातील वारकरी संप्रदाय वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वादन- गायन, कीर्तन- भजन, प्रवचने- व्याख्याने ह्या समाजाभिमुख कला पूर्वपरंपरेनुसार त्यांच्या घरात आहेत. त्यांच्या बाल्यावस्थेचा काळ हा बेलावडे मुक्‍कामीच गेला. वडील लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक होते. पुढे त्या शाळा बंद झाल्यावर वडिलांनी मुळशी तालुका विविध कार्यकारी सोसायटीत सचिव म्हणून सेवा सुरू केली. त्यामुळे त्यांना पौड या तालुक्‍याच्या ठिकाणी स्थायिक व्हावे लागले.
बापूंचे थोरले बंधू बाळकृष्ण हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे आजोळी गेले होते. त्यांनी शहरी जीवन लवकर पाहिले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले आणि त्यांनी बापूंना शिकविण्याचे मनोमन ठरवले. बापूंच्या अंगी असलेल्या चित्रकलेचे कौतुक ते नेहमी करत. त्यासाठी आवश्‍यक ती सर्व साधने ते आवडीने आणून देत असत.
बापूंच्या आईचे माहेर पुण्याचे सदाशिव पेठेचे. आईचे बंधू आणि चुलत बंधू सुविद्य आणि संस्कारिक होते. मायेने, आपुलकीने एकमेकांशी सुसंवाद करत होते. आईचे आणि वडिलांचे कष्ट बापूंनी लहानपणापासून पाहिले. त्यामुळे आई- वडिलांना शेवटपर्यंत त्रास होणार नाही, एवढी काळजी बापूंनी घेतली. संस्कारक्षम वयात चांगले गुरू भेटणे, हा योग फार महत्त्वाचा असतो आणि जयंतकुमार त्रिभुवन यांच्या रूपाने त्यांना ते गुरू भेटले देखील. पौडमधील त्रिभुवन हे ख्रिस्ती कुटुंब एक आदर्श कुटुंब होतं. सर्व कला त्या घरी वावरत होत्या. त्या घराच्या सावलीतच बापू लहानाचे मोठे होऊ लागले. जयंतकुमार त्रिभुवन हे त्या वेळी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांच्या प्रभावी अध्यापन कौशल्याचा परिणाम बापूंवर झाला आणि त्या अजाणत्या वयातही बापूंनी आपण शिक्षक व्हायचे, असे ठरवून टाकले. तसे घरी बोलून दाखवले. त्या दिशेने प्रवास करत 36 वर्षे पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून सेवा केली.

बापूंच्या मनावर संस्कार करणारे पौडमधील दुसरे एक ठिकाण होते; ते म्हणजे देऊळवाडा! लहानपणच्या विजय झुंजुरके, नाना सोनावणे, सुभाष हरसुले इत्यादी मित्रांच्या सहवासात त्या वाड्यात ते रमून जात. कार्तिक महिन्यातील कीर्तन सप्ताहात पाच दिवस होणारे कीर्तन म्हणजे गावाला सूर- ताल- कथा यांची मेजवानीच होती. मुलांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांना वाव देणारी दुसरी संधी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात मिळत असे. ते सर्व कार्यक्रम देऊळवाड्याच्या समोरील मंचावर होत असत. त्यामुळे बापूंना शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली.
घोटावडे येथे शिक्षक म्हणून बापूंच्या कार्याची सुरवात झाली आणि आकुर्डी येथे उपप्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ह्या 36 वर्षांत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही अनुभव विश्‍वाची त्यांना ओळख झाली. तेथे नाना स्वभावाची माणसं, विद्यार्थी, शिक्षक त्यांना भेटले. अनेक तऱ्हेची भेटलेली माणसं त्यांच्या कथेत येऊ लागली. अध्यापनात उदाहरण म्हणूनही येऊ लागली. त्यातूनच "बहुरूपी' आणि "शिमग्याची सोंगं' या दोन विनोदी कथासंग्रहात मजेशीर अनुभवांची शिदोरी वाचकांपर्यंत गेली. व्याख्यानाच्या बाबतीतही प्राचार्य रमेश पोतदार यांनी जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या मराठी विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या शिबिराला पाठविले आणि तिथे व्याख्यान देण्याचाही अनुभव आला. ग्रामीण भागामध्ये अशा व्याख्यानांची आवश्‍यकता आहे, हे बापूंना कळले आणि भोर, शिरूर, राजगुरुनगर, सासवड, येरवडा येथील माध्यमिक शिक्षकांना त्यांनी व्याकरणाची विशेष व्याख्यानं दिली.

त्या काळात 35 दिवसांत 70 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यामुळे आत्मविश्‍वास नष्ट झालेल्या, निराश झालेल्या विद्यार्थ्यांना उमेद देण्यासाठी त्यांनी "जीवन सुंदर आहे' हा विचार आग्रहाने मांडणे आवश्‍यक आहे म्हणून अनेक शाळेत, महाविद्यालयात ते व्याख्याने देत होते. ज्येष्ठांसाठी "...अजूनही जीवन सुंदर आहे' या विषयावर पुणे विद्यापीठ बहि:शाल विभागातर्फे व्याख्याने दिले. अशाप्रकारे त्यांनी शिक्षक, लेखक, व्याख्याता या भूमिका वठवल्या.
खानापूरलाच असताना एखाद्या अनोळखी वाटेवर आवडीची गोष्ट सापडावी तसे झाले. शिक्षक खोलीत किंवा वर्गात अनेक मजेशीर गोष्टी त्यांना अनुभवास यायच्या. बोलता बोलता विनोद व्हायचे. त्याच वेळी चित्रकला चांगली असल्याने या गोष्टी रेषेमध्ये पकडल्या तर? या विचाराने ते व्यंग्यचित्रांच्या क्षेत्राकडे वळाले. समाजातील विसंगती, विकृती, अतिरेक, जाहिराती, राजकारण, समाजकारण आणि विशेष म्हणजे मानवी स्वभावावरची टीका- टिप्पणी ते त्यातून मांडू लागले.

सन 1989 मध्ये "मोहिनी' या आनंद अंतरकरांच्या दिवाळी अंकात त्यांचे पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. "प्रभात'चे संपादक माधव खंडकरांनी जवळजवळ 14 वर्षे त्यांची चित्रं नियमित प्रसिद्ध केली. त्यातील उत्कृष्ट चित्रांचे पहिले प्रदर्शन प्रा. सुरेश मेहता यांनी "बालगंधर्व'ला भरविले. आतापर्यंत त्यांनी साडेबारा हजार चित्रे काढली असून, 20 प्रदर्शने शहरात आणि 5 ग्रामीण भागात अशी एकूण 25 प्रदर्शने भरवली आहेत. यातील ठराविक व्यंग्यचित्रांची दोन पुस्तके "लाफिंग क्‍लब' आणि "हास्यवाटिका' या नावाने प्रकाशित झाली आहेत. "सांजवार्ता', "संध्या', "राष्ट्रतेज' आणि "सकाळ' या दैनिकांच्या पुरवणीत त्यांची व्यंग्यचित्रे प्रसिद्ध होत असत.
या सर्व श्रमाच्या निमित्ताने त्यांच्यावर सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठानांची कौतुकाची थाप पडली. पर्वती भूषण पुरस्कार, सावली प्रतिष्ठान पुरस्कार, पुणे मनपातर्फे गौरव, कै. बाळासाहेब ठाकरे प्रतिभाशाली व्यंग्यचित्रकार म्हणून पुरस्कार, मोहिनी अंकातील खास व्यंग्यचित्रांचा पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचा "कलाभूषण' पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अशा या अवलिया कलाकाराने, ज्याने आयुष्यभर लोकांच्या ओठावर हास्य फुलवले, त्याने अचानक "एक्‍झिट' घेऊन डोळ्यात पाणी आणले...

Web Title: enthusiastic cartoonist bapu ghaware