शस्त्रपरवान्याच्या कागदपत्रात खाडाखोड करणाऱ्या लिपीकासह उद्योजकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : उद्योजकाशी संगनमत करुन शस्त्रपरवान्याच्या कागदपत्रामध्ये खाडाखोड करुन बेकायदेशीरपणे परवान्याच्या क्षेत्राची भारतभर व्याप्ती वाढविणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील एका लिपीकासह उद्योजकास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. जुन 2019 मध्ये हा प्रकार घडला होता. 

पुणे : उद्योजकाशी संगनमत करुन शस्त्रपरवान्याच्या कागदपत्रामध्ये खाडाखोड करुन बेकायदेशीरपणे परवान्याच्या क्षेत्राची भारतभर व्याप्ती वाढविणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील एका लिपीकासह उद्योजकास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. जुन 2019 मध्ये हा प्रकार घडला होता. 

राजेंद्र भिंताडे, अमर पवार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंताडे हा उद्योजक आहे, तर पवार हा पोलिस आयुक्तालयातील शस्त्र परवाना विभागामध्ये कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहे. भिंताडे हा उद्योजक असल्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्याने पोलिस आयुक्तांकडे शस्त्ररवान्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, भिंताडे याने पवार याच्याशी संगनमत करुन, त्यास 25 हजार रुपयांचे आर्थिक प्रलोभन दाखविले. त्यामुळे पवार याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या अधिकारामध्ये येत नसतानाही बेकादेशीरपणे शस्त्र परवाना क्षेत्र वाढविले. त्यानुसार, शस्त्र परवाना कागदपत्रामध्ये खाडाखोड करुन बनावट नोंद केली. त्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या शासकीय अभिलेखावर खाडाखोड करुन तिथेही बनावट नोंद केली. अशा प्रकारे बनावट व्याप्ती केलेला परवाना पवार याने भिंताडेला दिला. भिंताडेने हाच परवाना खरा म्हणून वापरला. 

दरम्यान, हे प्रकरण पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे सोपविले. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर भिंताडे व पवार यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीमध्ये दोघेही दोषी आढळल्याने गुन्हे शाखेने भिंताडे व पवार या दोघांनाही गुरूवारी अटक केली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur arrested for Misusing weapon license document