कोरेगाव पार्कमधून उद्योजकाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - खरेदी केलेल्या मालाचे पैसे न दिल्यामुळे कोरेगाव पार्क येथील एका उद्योजकाचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी (ता. 2) सकाळी घडली. मात्र, कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपींना रस्त्यातच खेड शिवापूरजवळ अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

या संदर्भात उद्योजकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर पांडुरंग चव्हाण (वय 28, रा. सांबरे, गडहिंग्लज), विनायक रावसाहेब चौगुले (वय 24, रा. माळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), निखिल नारायण पाटील (वय 23, रा. मांगोली, आकानगर, जि. कोल्हापूर), अरुण संभाजी परीट (वय 30, रा. सावर्डे, राधानगरी, जि. कोल्हापूर) आणि भय्यासाहेब दशरथ गायकवाड (वय 31, रा. कृष्णनगर, विठ्ठलवाडी, आकुर्डी, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती उद्योजक आहेत. त्यांच्या कारखान्यास पशुखाद्यासाठी आरोपी कच्चा माल पुरवठा करीत होते. त्या मालाचे पैसे देणे बाकी असल्यामुळे त्यांच्याकडून उद्योजकाकडे पैशांची वारंवार मागणी केली जात होती. परंतु, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून या पाच जणांनी मंगळवारी सकाळी घराबाहेर पडताच उद्योजकाचे अपहरण केले. उद्योजकाला ते मोटारीतून कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र, कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून आरोपींना नवले पुलाजवळ ताब्यात घेतले. 

Web Title: Entrepreneur kidnapping from Koregaon Park