लवळे येथे पर्यावरण, ग्रंथ आणि व्यसनमुक्ती दिंडी उत्साहात

धोंडिबा कुंभार
सोमवार, 23 जुलै 2018

लवळे (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचे औचित्य साधून पर्यावरण दिंडी, ग्रंथ दिंडी आणि व्यसनमुक्तीची दिंडी आदी विविधांगी बहुउद्देशीय दिंडीचे आयोजन केले होते.

पिरंगुट: लवळे (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचे औचित्य साधून पर्यावरण दिंडी, ग्रंथ दिंडी आणि व्यसनमुक्तीची दिंडी आदी विविधांगी बहुउद्देशीय दिंडीचे आयोजन केले होते.

वारकऱ्यांचा वेश परिधान करून ग्यानबा तुकारामच्या जयघोषात विविध अभंग म्हणत मोठ्या उत्साहाने विद्यार्थी, पालक, शिक्षक, गावातील भजनी मंडळ सहभागी झाले होते. झाडे लावा झाडे जगवा, वाचाल तर वाचाल, व्यसनाची फॅशन मृत्यूला निमंत्रण अशा घोषणा देत विद्यार्थी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. विठू नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शाळेच्या प्रांगणात भजनी मंडळाच्या व पालकांच्या उपस्थितीत रिंगणाचा सोहळा पार पडला.

मुख्याध्यापक संजय मारणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू केदारी, माजी सरपंच संजय सातव, बबन कुंभार, हभप मनोज महाराज पारखी, धनंजय गावडे, महेंद्र क्षिरसागर यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, पालक, शिक्षक उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

ग्रामस्थ व पालकांनी शाळेतील पुस्तक दानपेटीत पुस्तके दान करून ग्रंथालय समृद्ध होण्यास हातभार लावला. संपूर्ण दिंडी उपक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशील शिक्षक संगीता कुलकर्णी, बापूराव पवार, रविंद्र डोळसे, शुभांगी भालेराव, परमेश्वर जाधव, गणेश इंगळे, स्वाती इंगळे, अर्चना पोतदार, दीपाली इंदूरकर, उज्वला कटकदौंड, सुवर्णा पासलकर, ज्योती भगत यांनी मोठ्या परिश्रमाने प्रत्यक्षात उतरवली. शाळेच्या विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Web Title: Environment and granth dindi at lawale