वातावरण बिघडले; आजार वाढले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पिंपरी - दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक बेजार झाले असल्याचे निरीक्षण वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

पिंपरी - दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक बेजार झाले असल्याचे निरीक्षण वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

पुण्यात यंदा हिवाळा लांबला आहे. त्याचबरोबर थंडीचे दिवसही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. किमान तापमान १४ अंशांवरून दोन ते तीन दिवसांत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. त्यानंतर किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसवर आला. आता दिवसा उन्हाचा चटका वाढत असून, रात्री थंडी पडत आहे. अत्यंत कमी वेळेत होणाऱ्या अशा वातावरणातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

डॉ. सचिन गांधी म्हणाले, ‘‘सकाळी उन्हाचा चटका आणि रात्री थंडी, गार वारे असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही सर्दी, खोकला, ताप असा त्रास होत आहे. अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढली आहे.’’

डॉ. संतोष धुमाळे म्हणाले, ‘थंडीची तीव्रता आणि आता पुन्हा वाढणारे तापमान असे बदल अवघ्या आठवड्यात झाले. वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.’

विषाणूंच्या वाढीस पोषक स्थिती 
कमी वेळेत झालेल्या हवामानातील बदलांमुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते. या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण यामुळे वाढले आहे. त्यातून थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्यासारखे आजार वाढले आहेत, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

Web Title: Environment Changes Sickness Healthcare