पर्यावरण संतुलनाकडे सोसायट्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेने २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांसाठी आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना जाहीर केली. त्यास मोजक्‍या सोसायट्यांकडून प्रतिसाद मिळत असून बहुतांश सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे.

पिंपरी - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेने २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांसाठी आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना जाहीर केली. त्यास मोजक्‍या सोसायट्यांकडून प्रतिसाद मिळत असून बहुतांश सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे.

शहरातून रोज सुमारे ८५० मेट्रिक टन कचरा संकलित करून मोशी डेपोत नेला जातो. त्याला मोशी, भोसरी चऱ्होलीतील नागरिकांचा विरोध आहे. तसेच पुनावळ्यातील प्रस्तावित कचरा डेपोलाही तेथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत महापालिका शहरात स्वच्छता मोहीम राबवीत आहे. त्यात गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग वाढवा, यासाठी कर संकलन विभागाने आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना तीन वर्षांसाठी जाहीर केली आहे. मात्र, योजनेच्या पहिल्या वर्षी २०१७-१८ मध्ये केवळ १४ सोसायट्यांनीच सहभाग घेतला. त्यात अ, ब आणि ड क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील होत्या. त्यातील दोन सोसायट्यांचे अर्ज अपात्र ठरले. उर्वरित १२ पैकी केवळ तीनच सोसायट्या बक्षिसास पात्र ठरल्या. क, इ, फ, ग आणि ह क्षेत्रातील सोसायट्यांनी योजनेत सहभागच घेतला नाही. 

अशी आहे योजना
आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेसाठी पर्यावरणपूरक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, कचरा वर्गीकरण व प्रक्रिया राबविणे, पाणी संवर्धन व पुनर्वापर करणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, वृक्षारोपण व संवर्धन करणे असे निकष आहेत. ही योजना १२ ते १०० आणि १०० पेक्षा अधिक सदनिका, बंगलो किंवा रो- हाउस अशी दोन गटांसाठी आहे. यामधून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय एक याप्रमाणे आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातून आठ सोसायट्यांची निवड केली जाणार आहे. तपासणीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे स्टार रेटिंगनुसार ५ ते २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

स्वच्छ अभियानात शहरातील सोसायट्यांचा सहभाग वाढावा, यासाठी सुमारे साडेपाच लाख माहिती पत्रके वाटप केली आहेत. गृहनिर्माण सोसायटी व बचत गट यांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: environment society municipal garbage