पर्यावरण संवर्धनाचे प्रदर्शनातून धडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - पृथ्वीवरील जीवसृष्टीचे महत्त्व... पाण्याच्या बचतीचे उपाय... पवनऊर्जेचा वापर अन्‌ प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम... अशा वेगवेगळ्या प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत मंगळवारी पर्यावरणाचे महत्त्व पोचविण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भरविलेल्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यात आले. छोटे-छोटे प्रयोग, भित्तिपत्रके, प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आणि संवादात्मक कार्यक्रमातून त्यांच्यात पर्यावरण जागृतीचा विचार रुजविण्यात आला. 

"ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्‍सम्युलर भवन', "फर्ग्युसन महाविद्यालय' आणि "स्कूल्स पार्टनर्स फॉर फ्युचर प्रोजेक्‍टस्‌ (पॅश)'तर्फे आयोजित पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण प्रयोग पाहता आले. प्रदर्शनाचे उद्‌घाटन जर्मनीचे कौन्सिल जनरल युर्गेन मोरहार्ड यांच्या हस्ते झाले. "ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्‍सम्युलर भवन'च्या संचालिका हायडी वेट्‌झ-कुबाख, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, डॉ. सविता केळकर या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांच्या वापराविषयी उपाय सुचविण्यात आले आहेत. त्याशिवाय याचा पुनर्वापर कसा करता येईल आणि त्याचे जीवसृष्टीतील महत्त्व काय? यावर आधारित विविध प्रयोग आहेत. हे प्रदर्शन 29 जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत फर्ग्युसन महाविद्यालयातील लोअर रिक्रिएशन हॉलमध्ये पाहण्यास खुले राहील. 

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जगातील सर्व देशांनी एकत्र काम करण्याची व त्यावरील उपाय शोधण्याची आवश्‍यकता आहे. जर्मनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलत असून, भारतानेही त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. उपलब्ध ऊर्जेचा वापर कसा व कितपत करता येईल, याचाही विचार झाला पाहिजे. जगभरात गंभीर विषय बनलेल्या प्लॅस्टिकवरही उपाय शोधले जावेत. आज विकासासह आर्थिक सुबत्ताही वाढली आहे. अशावेळी पर्यावरण संवर्धनाचा विचार करणे हे आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीचा विचार रुजवला जावा. 
- युर्गेन मोरहार्ड, कौन्सिल जनरल, जर्मनी 

Web Title: Environmental exhibits lessons