शाडूच्या मातीच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा प्रयत्न

मिलिंद संगई
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर कमी होऊन प्रदूषणाचा स्तर कमी व्हावा या उद्देशाने फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेची संकल्पना मांडून तिला मूर्त स्वरुप दिले. 

बारामती शहर-  प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा घरोघरी व्हावी यासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने यंदाही अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर कमी होऊन प्रदूषणाचा स्तर कमी व्हावा या उद्देशाने फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेची संकल्पना मांडून तिला मूर्त स्वरुप दिले. 

गतवर्षी बारामती परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांनी अडीच हजारांहून अधिक शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या. यंदाही तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांद्वारे अशा गणेश मूर्ती साकारल्या जाणार आहेत. आज म.ए.सो.चे  कै. ग.भि. देशपांडे विद्यालयात तालुक्यातील कलाशिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीरात इको गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना, त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण या बाबत कलाशिक्षकांनी चर्चा केली. पुढील दोन आठवडे सर्व कलाशिक्षक आपापल्या शाळातून मुलांना इको गणेशमूर्ती बनविण्यास मदत करणार आहेत. 

स्वताःच्या हाताने तयार होणारी गणेशमूर्ती गतवर्षी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी प्राणप्रतिष्ठा करुन बसविली होती. यंदा गतवर्षाहून अधिक गणेशमूर्ती करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. 

Web Title: The Environmental Forum of India is trying for idol of shadu of ganeshji