ई-पॉस मशिनमुळे शिधापत्रिकाधारकांना दिलासा 

रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशिनचा वापर सुरू केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वेळेवर मिळणे सोपे झाले आहे. स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिनद्वारे धान्य विक्री बंधनकारक असून, त्याची नोंद थेट आता राज्य सरकारच्या अन्नधान्य वितरण विभागात होते. त्यामुळे धान्याचा काळाबाजार रोखण्यात अन्नधान्य पुरवठा विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. 

पुणे : ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशिनचा वापर सुरू केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वेळेवर मिळणे सोपे झाले आहे. स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिनद्वारे धान्य विक्री बंधनकारक असून, त्याची नोंद थेट आता राज्य सरकारच्या अन्नधान्य वितरण विभागात होते. त्यामुळे धान्याचा काळाबाजार रोखण्यात अन्नधान्य पुरवठा विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. 

ई-पॉस मशिनवर ज्येष्ठ नागरिक आणि काही महिलांच्या बोटाचे ठसे जुळत नाहीत. शहरातील काही भाग, ग्रामीण आणि दुर्गम भागात ई-पॉस मशिनला रेंज मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात शहरातील नाना पेठेतील डोके तालीमजवळ कल्पतरू महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन 'सकाळ'च्या प्रतिनिधीने शनिवारी पाहणी केली. तेथे ग्राहकांना ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरित करण्यात येत होते. दर महिन्याला वेळेवर धान्य मिळते, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्‍त केल्या. 

दरम्यान, केशरी रंगाची शिधापत्रिका असली, तरी त्यावर धान्य मिळण्याबाबत शिक्‍का मारला जातो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 59 हजार रुपये आहे, अशा शिधापत्रिकाधारकांनाच अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरित करण्यात येते, अशी माहिती अन्नधान्य वितरण विभागातील सूत्रांनी दिली. 

कसा होतो ई-पॉस मशिनचा वापर 
ई-पॉस मशिनवर शिधापत्रिकेला आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यात येतो. त्यासोबतच मोबाईल क्रमांक आणि अंगठ्याचा ठसा घेतला जातो. शिधापत्रिकेवरील कोणत्याही एका व्यक्‍तीचा ठसा चालतो. स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा घेतला जातो. त्यानंतर विक्रेत्याकडून मोबाईल क्रमांक टाइप करून बिल दिले जाते. त्यानंतरच ग्राहकाला धान्य दिले जाते. 

विक्रीची नोंद थेट पुरवठा विभागात 
ई-पॉस मशिनद्वारे स्वस्त धान्य दुकानातून नेमके किती धान्य वितरित झाले, त्याची ऑनलाइन माहिती पुरवठा विभागात आणि राज्य सरकारच्या अन्नधान्य वितरण विभागाकडे नोंद केली जाते. या पारदर्शक कारभारामुळे ग्राहकांच्या तक्रारी दूर होण्यासोबतच काळाबाजार रोखण्यास मदत झाली आहे. 

शिधापत्रिकेवर आम्हाला दर महिन्याला वेळेवर धान्य मिळते. नियमानुसार गहू, तांदूळ आणि तूरडाळ मिळते. 
- अमीना चॉंद शेख, नाना पेठ 

केशरी शिधापत्रिकेवर धान्य (प्रति व्यक्‍ती) 
धान्य किलो दर प्रतिकिलो 
गहू - 3 किलो 2 रुपये 
तांदूळ- 2 किलो 3 रुपये 
तूरडाळ प्रतिकार्ड एक किलो 55 रुपये 

केवळ अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकास 
एक किलो साखर (दर- 20 रुपये) 

तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक - 7620343324 

स्वस्त धान्य दुकानाची वेळ : 
सकाळी 8 ते 12 
सायंकाळी 4 ते 8 
दर महिन्यात 7 तारखेला - सकाळी 8 ते रात्री 8 

''ई-पॉस मशिनवर बोटांचे ठसे न उमटल्यामुळे धान्य मिळण्यास अडचण आल्यास ग्राहकाने संबंधित पुरवठा निरीक्षकांकडे तक्रार करावी. त्या पुरवठा निरीक्षकाने ठसा दिल्यानंतर संबंधित ग्राहकाला धान्य वितरित करण्यात येते. धान्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. 
- स्मिता जोशी, पुरवठा निरीक्षक, अन्नधान्य वितरण 'ग' विभाग (मंडई)

Web Title: epos machines helping citizens to get Cereals on time