स्वातंत्र्यसैनिकाची नव्वदीतही देशसेवा! 

प्रा. प्रशांत चवरे   
सोमवार, 29 जुलै 2019

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील मारुती पिराजी धुमाळ यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिले; तसेच स्वातंत्र्यानंतर सैन्यामध्ये भरती होत देशसेवाही केली आणि आता निवृत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन ते शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यांनी येथील कला महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच, परिसरातील तीन शाळा व एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. एकप्रकारे ते देशसेवा करत आहेत. 

इंदापुरातील मारुती धुमाळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदतीसह शिष्यवृत्तीही 

भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक मारुती पिराजी धुमाळ यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिले; तसेच स्वातंत्र्यानंतर सैन्यामध्ये भरती होत देशसेवाही केली आणि आता निवृत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन ते शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यांनी येथील कला महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच, परिसरातील तीन शाळा व एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. एकप्रकारे ते देशसेवा करत आहेत. 

मारुती धुमाळ यांनी यांनी सेवानिवृत्तीनंतर भिगवण व परिसरामध्ये पाणीवाटप सोसायट्या स्थापन करत शेतकऱ्यांना साह्य केले. सध्या त्यांचे वय 86 आहे. त्यांना मागील काही दिवसांमध्ये आर्थिक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबत असल्याचे विदारक चित्र लक्षात आले. त्यांनी तक्रारवाडी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण आणि रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयाशी संपर्क साधला. या चारही शाळांना स्वतःच्या निवृत्ती वेतनातील प्रत्येक शाळेस वीस हजार रुपये, असे एकूण 80 हजार रुपये देत गरजू हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी स्वातंत्र्य सैनिक शिष्यवृत्ती सुरू केली. कला महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले. 

या विद्यार्थ्यांना धुमाळ, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, श्रीनाथ सोसायटीचे माजी अध्यक्ष खंडू गाडे, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत व शालेय साहित्य प्रदान करण्यात आले. 

भिगवण व तक्रारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी शिक्षण घेतले. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राममध्ये सहभागी झालो व सैन्य दलांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. शाळेच्या व देशाच्या ऋणातून काही प्रमाणात मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य सैनिक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याबरोबरच देशसेवेचीही प्रेरणा मिळेल. 
- मारुती धुमाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ereedom fighter is giving scholarships