महावितरणकडून धायरीतील कारवाईत त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

धायरी येथील प्रकरणात महावितरणने केलेल्या कारवाईत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. एका ठिकाणी एकाच मालकाचे दोन वीजमीटर असताना त्यापैकी एकाच वीजमीटरवर कारवाई करून त्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे; तसेच एका पॉइंट मालकावर महावितरणकडून अद्याप कारवाई झालेली नाही.

पुणे - धायरी येथील प्रकरणात महावितरणने केलेल्या कारवाईत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. एका ठिकाणी एकाच मालकाचे दोन वीजमीटर असताना त्यापैकी एकाच वीजमीटरवर कारवाई करून त्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे; तसेच एका पॉइंट मालकावर महावितरणकडून अद्याप कारवाई झालेली नाही.

धायरी येथील पाणी आणि वीजचोरीचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले. या प्रकरणामध्ये महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यापैकी एका मालकाचे वीजमीटर सील केले; तर दुसऱ्या एका मालकावर कारवाई करून १९ लाख रुपयांचे वीजबिल देण्यात आले. त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. आता अधिक चौकशी केल्यानंतर भरारी पथकाने कारवाई करताना अनेक त्रुटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

कालव्याला भगदाड पाडून पाणी विहिरीत आणले जात होते आणि विहिरीतून ते टॅंकरमध्ये भरण्यासाठी कृषीपंपांसाठीच्या वीजमीटरचा वापर सुरू होता. त्या मीटरवर कारवाई करून, त्यावर झालेल्या वीजवापराची तपासणी भरारी पथकाने केली. त्याच मीटरच्या शेजारी संबंधित मालकाचे आणखी एक कृषीपंपासाठीचे वीजमीटर आहे. त्याचाही अनधिकृत वापर सुरू आहे. त्यावर भरारी पथकाने कारवाई केली नाही. वास्तविक, कृषीपंपासाठीच्या घेतलेल्या दोन्ही वीजमीटरवर कारवाई होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र एकाच मीटरची नोंद पंचनाम्यामध्ये करण्यात आली, असे महावितरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

कारवाईत अशाप्रकारे त्रुटी ठेवण्यामागील कारण काय, जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आल्या का, असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तसेच, एका पॉइंटमालकाचे कृषीपंपासाठी असलेल्या वीजमीटर केवळ सील केले आहे. मात्र, त्यापलीकडे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यामागेही काय कारण असावे, असाही प्रश्‍न निर्माण होत आहे.

भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. विजेचा वापर किती झाला, हे तपासून ते बिल निश्‍चित करण्यात येईल. संबंधित मीटर मालकाकडून नियमानुसार कारवाई करून बिल वसूल केले जाईल.
- अजित पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, धायरी

Web Title: Error in action of MSEB in Dhayri

टॅग्स