व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोळीबार प्रकरणाची सुनावणी

court_Hearing
court_Hearing

दौंड  : दौंड शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून गोळीबार करून तिघांचा खून करणारा संशयित मारेकरी तथा बडतर्फ सहायक पोलिस उप निरीक्षक संजय शिंदे याची विरोधात असलेल्या खटल्याची सुनावणी तुरुंगातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्याचा पोलिसांचा विनंती अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी काल (ता. १५) या बाबत माहिती दिली. दौंड येथील इंडियन रिझर्व बटालियन मध्ये कार्यरत असणार्या संजय बळीराम शिंदे (वय ३२) याने १६ जानेवारी रोजी शासकीय पिस्तूलातून परशुराम गुरूनाथ पवार ( वय ३३), गोपाळ काळुराम शिंदे (वय ३५ , दोघे रा. वडारगल्ली, दौंड ) व अनिल विलास जाधव ( वय ३०, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) या तिघांवर भरदिवसा एकूण दहा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर संजय शिंदे हा दुचाकीवरून नगरच्या दिशेने निघाला असता त्यास १६ जानेवारी रोजी सायंकाळी नाकाबंदी मध्ये सुपे (जि. नगर) येथे ताब्यात घेण्यात आले होते. पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशील कटारे यांनी २९ जानेवारी रोजी संजय शिंदे यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास सध्या येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

संजय शिंदे हा स्वतः पोलिस दलात सहायक फौजदार राहिल्याने त्याला न्यायालयीन कामासाठी येरवडा येथून दौंड येथे आणताना तो पळून जाण्याची, त्याच्यावर हल्ला होण्याची किंवा घातपात होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने सदर विनंती अर्ज मंजूर केल्याची माहिती श्री. निंबाळकर यांनी दिली.  

संजय शिंदे याने आंनद अण्णाराव जाधव (रा. गोवा गल्ली, दौंड) या सावकाराविरूध्द केलेल्या तक्रारीनंतर दौंड पोलिस ठाण्यात ३१ जानेवारी २०१८ पासून आनंद जाधव याच्यासह एकूण सहा सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

शासकीय सेवेतून बडतर्फ...
इंडियन रिझर्व बटालियनचे समादेशक खुशाल सपकाळे यांनी संजय शिंदे यास शासकीय पिस्तूलाचा वापर करून तीन जणांचा खून केल्याप्रकरणी अटक झाल्याने २९ जानेवारी २०१८ पासून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे, अशी माहिती भगवान निंबाळकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com