जुन्नर : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या निमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जुन्नर : ऐतिहासिक जुन्नरच्या वैभवात भर टाकण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील नियमीत स्वच्छता करणारे सफाई कामगार हे स्वच्छतेचा आत्मा असल्याचे प्रतिपादन जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले.

जुन्नर : ऐतिहासिक जुन्नरच्या वैभवात भर टाकण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील नियमीत स्वच्छता करणारे सफाई कामगार हे स्वच्छतेचा आत्मा असल्याचे प्रतिपादन जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले.

जुन्नर नगर पालिकेच्या संभाजी महाराज सभागृहात पत्रकार दिनाच्या तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान व सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमात पांडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दत्ता म्हसकर, जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दादा रोकडे, माजी अध्यक्ष नितीन ससाणे, उपाध्यक्ष इस्माईल सय्यद, नितीन गाजरे, नगरसेवक दीपेश परदेशी, समीर भगत, अविनाश कर्डीले, अंकिता गोसावी, हजरा इनामदार, सुवर्णा बनकर, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री. आदी मान्यवर तसेच सफाई कामगार उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, जुन्नर शहरामध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वच्छता हा मुलभूत घटक असून पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी मोहीम राबविली जात आहे. यामध्ये शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व समजण्यासाठी फलक, सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छतेचे संदेश देणारी माहिती चित्र स्वरूपात काढण्यात आली आहे. सफाई कामगारांचे शहराच्या स्वच्छतेमध्ये मोलाचे योगदान असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना गणवेश वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जुन्नर शहर हे माझे घर आहे ना भावनेतून नागरिकांनी स्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पांडे यांनी केले.  

याप्रसंगी पत्रकार दिनाचे औचित्य साधून जुन्नर शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर, धर्मेंद्र कोरे, समीर भगत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश परदेशी यांनी केले तर आभार अंकिता गोसावी यांनी मानले. 
 

Web Title: esakal marathi news junnar news