दौंड | शिक्षकाची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या 3 सावकारांना अटक

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

नागरिकांनी बेकायदा सावकारी करणारे व वसुलीसाठी छळ करणार्यांविरुध्द दौंड पोलिस ठाण्यात ०२११७२६२३३३ किंवा ९५५२५२१५६५ या क्रमांकावर माहिती देऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

दौंड : दौंड तालुक्यातील एका शिक्षकाची बेकायदा खासगी सावकारीच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह एकूण चार खासगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. थकबाकीची रक्कम न दिल्यास दोन सावकारांनी सदर शिक्षकास गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. 

दौंड तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सुभाष विठ्ठल भोसले (वय ४८, रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांनी या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात १ फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शंकर उर्फ विष्णू भीमा चौगुले, बापू उर्फ युवराज पांडुरंग बंडगर (दोघे रा. वडार गल्ली, दौंड), नवनाथ शिरक्या चव्हाण, स्वाती चव्हाण (दोघे रा. खोरवडी, ता. दौंड) यांच्याविरूध्द धाकदपटशा करणे आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुभाष भोसले यांनी ८ जानेवारी २०१४ रोजी विष्णू चौगुले, युवराज बंडगर या दोघांकडून भावाच्या वैद्यकीय उपचारांसाठी मासिक दहा टक्के या व्याजदराने तीन लाख रूपये घेतले होते. व्याजापोटी ४ लाख ९० हजार रूपये घेऊन देखील चौगुले व बंडगर यांनी सुभाष भोसले यांची वडिलोपार्जित दोन एकर शेतजमीनीचा बिगर ताबा साठेखत करून घेतले होते. त्याचबरोबर सात लाख रूपये येणे असल्याचे सांगत सदर रक्कम न दिल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. सदरच्या तगाद्याला व त्रासाला कंटाळून सुभाष भोसले यांनी फिर्याद दाखल केली. 

त्याचप्रमाणे सुभाष भोसले यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी नवनाथ शिरक्या चव्हाण, स्वाती नवनाथ चव्हाण (दोघे रा. खोरवडी, ता. दौंड) यांच्याकडून मासिक दहा टक्के या व्याजदराने शंभर रूपयांच्या कोऱ्या मुद्रांकावर सह्या करून एक लाख रूपये घेतले होते. सदर कर्जाच्या व्याजापोटी १ लाख ६८ हजार रूपये देऊनदेखील नवनाथ चव्हाण याने ३ लाख १० हजार रूपये येणे असल्याचे सांगत सदर रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुभाष भोसले यांनी फिर्याद दाखल केले.

दौंड पोलिसांनी या गुन्ह्यात शंकर उर्फ विष्णू भीमा चौगुले, बापू उर्फ युवराज पांडुरंग बंडगर व नवनाथ शिरक्या चव्हाण या तिघांना अटक केली आहे.

दौंड पोलिसांनी मागील दोन दिवसांत ४ खासगी सावकारांना अटक केली आहे.

Web Title: esakal marathi news pune daund arrest police

टॅग्स